Maharashtra St Ticket Free : राज्य शासनाकडून राज्यातील नागरिकांसाठी विविध योजना कार्यान्वित केल्या जातात. यात राज्याच्या काही घटकातील नागरिकांना एसटीच्या प्रवासात तिकीट दरात सवलत दिली जात आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यातील महिलांना एसटीच्या तिकीट दरात 50% सवलत देण्यात आली आहे.
म्हणजेच आता राज्यातील महिलांना एसटीमध्ये अर्ध्या तिकीटात प्रवास करता येत आहे. याव्यतिरिक्त राज्यातील 75 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना देखील तिकीट दरात सवलत देण्यात आली आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात 100% सवलत देण्यात आली आहे.
अर्थातच एसटी महामंडळाच्या बसमध्ये जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणे शक्य झाले आहे. याव्यतिरिक्त अपंग व्यक्तींसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी देखील एसटीच्या प्रवासात तिकीट दरात सवलत दिली जाते. विद्यार्थ्यांना एसटीच्या प्रवासात पासची व्यवस्था आहे.
तसेच राज्यातील सिकलसेल, एचआयव्ही, डायलेसिस आणि हिमोफेलिआ रुग्णांना देखील एसटीच्या प्रवासात सवलत दिली जाते. या गंभीर आजाजाराने ग्रसीत रुग्णांना एसटीमध्ये मोफत प्रवासाची सवलत आहे. खरंतर या रुग्णांना उपचारासाठी वारंवार रुग्णालया जावे लागते.
म्हणून या रुग्णांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून एसटीच्या साध्या आणि निम आराम श्रेणीतील बसेस मध्ये सवलत दिली जात आहे. दरम्यान आता एसटी महामंडळात विजेवर धावणाऱ्या म्हणजेच इलेक्ट्रिक वातानुकूलित बस मध्ये देखील या रुग्णांना सवलतीत प्रवास करता येणार असल्याचे सांगितले जात आहे.
यासाठी वाहतूक विभागाकडून प्रस्ताव तयार केला जात आहे. निश्चितच या रुग्णांना जर वातानुकूलित ई बस मध्ये देखील सवलतीत प्रवास करता आला तर या रुग्णांना उपचारासाठी मोठी मदत मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, एसटी महामंडळात विजेवर धावणाऱ्या पाच हजार तीनशे बसेस दाखल होणार आहेत.
अशा परिस्थितीत या बसेस महामंडळात दाखल झाल्यानंतर या रुग्णांना या बसेसमधून मोफत प्रवास करता यावा म्हणून हा प्रस्ताव वाहतूक विभागाकडून तयार होत असल्याचे नमूद केले जात आहे. निश्चितच हा निर्णय झाला तर संबंधितांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.