महाराष्ट्रातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा नादखुळा ! राजगिरासारख्या दिसणाऱ्या ‘या’ पिकाची यशस्वी शेती केली, लाखोंची कमाई झाली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Successful Farmer : राज्यातील शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबवले आहेत. विशेष म्हणजे हे नवीन प्रयोग शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू लागले आहे. असाच एक नवीन प्रयोग विदर्भातही पाहायला मिळाला आहे. विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने राजगिरा आणि भगर सारख्या दिसणाऱ्या क्विनोवा शेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे.

त्यामुळे सध्या या शेतकऱ्याची संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे. वाशिम तालुक्यातील कोंडाळा झामरे येथील विनोद बुंधे या शेतकऱ्याने पारंपारिक पिकाला फाटा देत या नवीन नगदी पिकाची शेती सुरू केली आहे. सध्या स्थितीला विनोद यांनी लागवड केलेले हे नगदी पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असून यातून त्यांना एकरी सात ते दहा क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळणार असा विश्वास आहे.

परिणामी या पिकातून त्यांना लाखो रुपयांची कमाई होणार आहे. खरेतर, या पिकाच्या लागवडीचा प्रयोग महाराष्ट्रात याआधी देखील झाला आहे. अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातील काही प्रगतिशील शेतकऱ्यांनी या पिकाची यशस्वी लागवड करून दाखवली आहे.

विशेष म्हणजे येथील शेतकऱ्यांना या पिकातून लाखोंची कमाई झाली आहे. वास्तविक अलीकडे शेतीचा व्यवसाय आव्हानात्मक बनला आहे. अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ यांसारख्या नानाविध संकटांमुळे शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाहीये.

पारंपारिक पिकांसाठी केलेला खर्च देखील आता शेतीमधून भरून काढता येत नाहीये. यामुळे आता पीक पद्धतीत बदल करणे ही काळाची गरज बनली आहे. हीच गरज ओळखून वाशिम तालुक्यातील शेतकऱ्याने क्विनोवा शेतीचा प्रयोग केला आहे.

विनोद यांनी सांगितल्याप्रमाणे क्विनोवा हे एक प्रमुख तृणधान्य पीक आहे. या पिकाची रब्बी हंगामामध्ये शेती होते. 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर हा काळ या पिकाच्या लागवडीसाठी सर्वात अनुकूल असल्याचे त्यांनी सांगितले. या एका महिन्याच्या काळात या पिकाची लागवड केली तर चांगले उत्पादन मिळते.

विनोद यांनी सुद्धा याच काळात या पिकाची लागवड केली आणि त्यांना यातून आता चांगले उत्पादन मिळणार आहे. या पिकाच्या पेरणीसाठी एकरी फक्त एक ते दोन किलो बियाणे लागते. हे पीक अवघ्या 90 दिवसात तयार होते. या तीन महिन्यांच्या काळात पिकाला चार ते पाच वेळा सिंचन करावे लागते.

या पिकाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या पिकाच्या यशस्वी उत्पादनासाठी अधिक कीटकनाशकाची फवारणी करावी लागत नाही. परिणामी फवारणीवरील हजारो रुपयांचा खर्च वाचतो. याला कमी पाणी लागते यामुळे दुष्काळी परिस्थितीमध्ये हे पीक चांगले येणारे आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हलक्या जमिनीतही याची शेती होऊ शकते.

यापासून धान्याचे उत्पादन तर मिळतेच शिवाय याचा कडबा हा पशुचारा म्हणूनही वापरला जातो. क्विनोवापासून उपमा आणि शिरा तयार केला जातो. यामुळे भारतीय बाजारांमध्ये याला मोठी मागणी आहे. शिवाय हे एक सुपरफूड असल्याने जागतिक बाजारपेठात देखील याला मोठी मागणी आहे आणि चांगला दरही मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशमधील निमज येथे याची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान, विनोद यांनी लागवड केलेल्या या पिकातून त्यांना चांगले उत्पादन मिळाले असल्याने नजीकच्या काळात इतर प्रयोगशील शेतकरी देखील याचे अनुकरण करतील आणि या पिकाचे लागवडीखालील क्षेत्र हळूहळू का होईना पण वाढेल अशी आशा आहे.

Leave a Comment