Maharashtra Tadoba Tiger Viral News : प्रेम हे आंधळ असतं. हे प्रेम अशक्य गोष्ट देखील शक्य करून दाखवते. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून देखील असेच एक उदाहरण समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील एका वाघाने आपल्या प्रेयेसीच्या शोधात तब्बल दोन हजार किलोमीटर लांबीचा अन चार राज्यांमधला खडतर प्रवास केला आहे.
या ताडोबाच्या वाघाने त्याच्या प्रेयसी वाघिणीच्या शोधात तब्बल दोन हजार किलोमीटर लांबीचा आणि चार राज्यांमधला रस्ते, नद्या, गाव असा अडथळ्यांचा आणि जोखीमीचा प्रवास पूर्ण करत ओडिशाचे जंगल गाठले आहे.
ओडिशा येथील जंगलात ताडोबाचा व्याघ्र प्रकल्पांमधील वाघ आढळल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. ओडिशा येथील एका वन अधिकाऱ्याने ताडोबातील वाघ तेथील जंगलांमध्ये आढळला असल्याची माहिती दिली आहे.
दरम्यान अधिकाऱ्यांनी या ताडोबाच्या राजाने एक तर सुरक्षित प्रदेशाच्या शोधात किंवा मग जोडीदाराच्या शोधात एवढा लांबचा प्रवास केला असावा असा अंदाज बांधला आहे.
यामुळे, सध्या या जिगरबाज वाघाची आणि त्याच्या या प्रवासाची प्रसार माध्यमांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. यानिमित्ताने प्रेम हे आंधळं असत मग ते जंगलाच्या राजाचे, वाघाचे का असेना अशा चर्चा प्रसार माध्यमांमध्ये सुरू झाल्या आहेत.
कशी पटली ओळख ?
ओडिषा मध्ये ताडोबा येथील व्याघ्र प्रकल्पातील वाघ आढळला आहे. तेथील जंगलांमध्ये हा वाघ आढळला आहे. खरे तर या वाघाला रेडिओ कॉलर लावण्यात आलेला नव्हता.
त्यामुळे याची ओळख पटवणे थोडे अवघड होते. मात्र पट्ट्यांच्या पॅटर्नवरून ओडिशा येथील वन विभागातील अधिकाऱ्यांनी तो ताडोबातील असल्याची खात्री केली आहे.
वास्तविक, या वाघाने सप्टेंबरमध्ये गजपती भागात पशुधनाची शिकार केली होती. ही शिकार झाल्यानंतर त्या ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले. कॅमेरे लावल्यानंतर कॅमेरात हा वाघोबा कैद झाला.
यानंतर मग या वाघाची तेथील वन्यजीव संस्थेने त्याच्या अंगावर असलेल्या पट्ट्याच्या पॅटर्न वरून ओळख पटवली. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील ताडोबाच्या लँडस्केप मधील हा नर वाघ असावा असे सांगितले जात आहे.
याबाबत ब्रह्मपुरीचे उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा यांनी वाघ ताडोबातून शिंदेवाई तालुक्यात आला असावा व येथून त्याने ओडिसा गाठलेले असावे असा अंदाज बांधला आहे. दरम्यान वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट डेहराडून यांनी या वाघाची पुष्टी केली आहे.