Maharashtra Weather Forecast :- बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात मार्गे आता राजस्थानमध्ये दाखल झाले असून त्या ठिकाणी त्याचा वेग काहीसा कमी झाला असून त्याचे रूपांतर तीव्र अशा कमी दाबाच्या पट्ट्यात झाले आहे.परंतु या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मान्सूनचा वेग काहिसा मंदावला असून तो कोकणातच रखडला आहे. राज्याचा विचार केला तर मान्सूनची एन्ट्री सरासरी 10 जून च्या दरम्यान महाराष्ट्रात होत असते.
परंतु तो अद्याप पर्यंत या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकण वगळता इतर भागांमध्ये सरकू शकला नाही. त्यामुळे संपूर्ण राज्यात खरीपाच्या पेरण्या रखडले असून राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ तसेच खानदेश पट्ट्यात बागायती क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आली आहे. परंतु अजून देखील पावसाची प्रतीक्षा आहे.
मान्सून 23 जून पासून विदर्भ व मराठवाड्यात होईल दाखल
सध्या मान्सूनची स्थिती पाहिली तर 23 जून पासून विदर्भ व मराठवाड्यात तेलंगणातून नाशिक सह उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात कोकणातून दाखल होण्याची शक्यता आहे. परंतु तोपर्यंत विदर्भ वगळता उर्वरित राज्यात मान्सूनपूर्व पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र मध्ये सरासरीपेक्षा दुप्पट म्हणजेच ताशी 15 किलोमीटरच्या आसपास वाऱ्याचा वेग राहण्याचा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.
राज्यामध्ये दरवर्षी 10 जून पर्यंत दाखल होणारा मान्सून यावर्षी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकण वगळता इतर राज्यांमध्ये दाखल होऊ शकला नाही. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या रखडले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना चांगले पावसाचे प्रतीक्षा असून चांगला पाऊस पडल्याशिवाय पेरण्या करू नयेत असे देखील तज्ञांनी सांगितले आहे.
तसेच 23 ते 29 जून दरम्यान कोकण व गोवा उपविभागामध्ये मान्सून अधिक सक्रिय होऊन सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. 23 जूनला सुरू होणाऱ्या व 6 जुलैला संपणाऱ्या पंधरवड्यामध्ये कोकण, विदर्भ तसेच मराठवाड्यात पेरणी योग्य असा मध्यम तर सह्याद्री घाटमाथा व मध्य महाराष्ट्रात साधारण मोसमी पावसाची शक्यता आहे.
उत्तर भारतात 22 जून पर्यंत होईल पाऊस
केदारनाथ, बद्रीनाथ तसेच गंगोत्री, यमुनोत्री, सिमला, कुलु मनाली आणि डेहराडून इत्यादी परिसरामध्ये रविवार म्हणजेच आज पासून ते 22 जून पर्यंत पावसाची शक्यता असून त्या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांनी काळजी घेण्याचे देखील आवाहन भारतीय हवामान विभागाने केले आहे.