Soybean Farming: सोयाबीनची पेरणी करायची असेल तर करा ‘या’ पद्धतीने, होईल उत्पादनात वाढ आणि वाचेल खर्च

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Farming: खरीप हंगामामध्ये प्रामुख्याने सोयाबीन आणि कपाशी या पिकांची लागवड केली जाते. यामध्ये सोयाबीन या पिकाचा विचार केला तर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीन लागवड केली जाते. पिकांपासून जर अधिकचे उत्पादन हवे असेल तर व्यवस्थापन जितके महत्त्वाचे आहे तितकेच त्याच्या लागवडीच्या पद्धती देखील महत्त्वाचे आहेत. बऱ्याचदा लागवड पद्धतीत चूक केल्यामुळे देखील उत्पादनाला फटका बसतो. याच अनुषंगाने सोयाबीन लागवड किंवा पेरणीची पद्धत योग्य पद्धतीने वापरल्यास नक्कीच याचा फायदा होतो.

बऱ्याचदा चुकीची पेरणी पद्धत वापरल्यामुळे पिकाची जागा, सूर्यप्रकाश तसेच जमिनीतील ओल, अन्नद्रव्य यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर स्पर्धा निर्माण होते व पिकांची दाटी झाल्यामुळे पिकांची वाढ खुंटते. बऱ्याचदा दाट पेरणी केल्यामुळे किडी व अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतो आणि तो लक्षात देखील येत नाही. अशाप्रकारे बरेच  नुकसान होऊ शकते. त्यामुळे आपण या लेखांमध्ये  सोयाबीनच्या जोड ओळ पद्धत आणि फायदे याबद्दल माहिती घेणार आहोत.

 सोयाबीनची जोडओळ पद्धत

या पद्धतीने जर सोयाबीनची पेरणी करायची असेल तर त्याकरिता प्रचलित पद्धतीनेच म्हणजेच काकरीने अथवा तीफनीने, सरत्याने शेताच्या उताराला आडवी पेरणी करावी. पेरणी करताना दोन ओळींमधील अंतर कमीत कमी करून जोड ओळींमध्ये पेरणी करावी. तसेच दोन जोळओळीमधील अंतर, दोन ओळींमधील अंतरापेक्षा दुप्पट ठेवावे जेणेकरून प्रत्येक जोड ओळीनंतर मोकळी जागा ठेवले जाते व पीक साधारणपणे 15 ते 20 दिवसाच्या झाल्यानंतर त्या ठिकाणी डवऱ्याच्या फेरी वेळी डवऱ्याला दोरी बांधून बलराम नांगराच्या साह्याने सरी पाडल्यास मूळ स्थानी पावसाच्या पाण्याचे संवर्धन करणे देखील शक्य होऊ शकते.

या पद्धतीने जर पेरणी करायची असेल तर एक फुटी काकरीने शेतात काकर पाडून घ्यावेत. काकर पाडल्यानंतर मजुरांच्या साह्याने सोयाबीन बियाण्याची पेरणी दोन झाडातील अंतरानुसार साधारणपणे साडेसात ते आठ सेंटीमीटर अंतरावर टोकन पद्धतीने करावी. टोकन पद्धतीने पेरणी करताना दोन ओळी टोकाव्या व तिसरी ओळ खाली ठेवावी.

अशाप्रकारे जोड ओळीत पेरणी करताना प्रत्येक तिसरी ओळ खाली ठेवल्यामुळे दोन जोड ओळींमध्ये दोन फुटांची जागा खाली राहिल. या ठिकाणी डवऱ्याच्या फेराच्या वेळी  सरी अथवा गाळ पाडून घेतलास जोड ओळ पद्धतीने पेरलेले सोयाबीन गादी वाफेवर येते. या पद्धतीमध्ये सोयाबीनच्या प्रती एकर झाडांची संख्या प्रचलित पद्धती एवढीच ठेवली जाते व उत्पादनात शाश्वत वाढ होते.

 जोळओळ पेरणी पद्धतीचे फायदे

 या पद्धतीने सोयाबीन पेरणी केल्यास प्रति एकर झाडांच्या संख्येसोबत कुठलीही तडजोड न करता प्रचलित असलेल्या पद्धती एवढीच शिफारशीनुसार झाडांची संख्या ठेवली जाते. तसेच या दोन जोड ओळींमधील जी काही मोकळी जागा असते तिचा विविध प्रकारे उपयोग करता येऊ शकतो. तसेच मूलस्थानी पावसाच्या पाण्याचे संवर्धन शक्य होते. पिकांचे निरीक्षण तसेच निगराणी, फवारणी, आंतरमशागत इत्यादी कामे करणे सहज शक्य होते. शेतामध्ये हवा खेळती राहते व पिकांना सूर्यप्रकाशाचे वितरण सारख्या प्रमाणात  होऊ शकते. पाण्याचे सोय असेल तर पाटपाणी किंवा स्प्रिंकलर च्या माध्यमातून देखील चांगल्या पद्धतीने ओलित करता येते.

Leave a Comment