Maharashtra Weather News : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशातील विविध भागांमधील हवामानात सातत्याने बदलत आहे. खरंतर दरवर्षी डिसेंबर महिन्यात राज्यात थंडीचा जोर वाढत असतो. नोव्हेंबर महिन्यापासूनच थंडी पडायला सुरुवात होते. यंदा मात्र थंडीचा जोर अजूनही वाढलेला नाही.
डिसेंबरचा पहिला आठवडा उलटत चालला आहे मात्र थंडी अपेक्षित अशी पडलेली नसल्याने जोरदार थंडीला केव्हा सुरूवात होणार हा सवाल कायम आहे. कडाक्याच्या थंडीची सर्वत्र वाट पाहिली जात आहे. अशातच मात्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस पाहायला मिळत आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पावसाची तीव्रता काहीशी कमी झाली आहे. पण अवकाळी पावसाचे सावट अजूनही पूर्णपणे नाहीसे झालेले नाही. हवामान खात्याने आगामी तीन ते चार दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
काय म्हणतंय हवामान विभाग
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यासह देशातील विविध भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हे या हंगामातील तिसरे चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील नेल्लोर आणि मछलीपट्टणमदरम्यान धडकण्याची शक्यता आहे. उद्या अर्थातच पाच डिसेंबर 2023 ला हे चक्रीवादळ या भागाला धडकणार आहे. दरम्यान या चक्रीवादळाचा महाराष्ट्राला थेट कोणताही धोका नाही.
याचा राज्यावर फारसा विपरीत परिणाम पाहायला मिळणार नाही असे सांगितले जात होते. पण मात्र चक्रीवादळात मोठ्या प्रमाणावर बाष्प आहे. याचा परिणाम म्हणून राज्यातील हवामानात बदल होत आहे.
आता राज्यात पुढील ३ ते ४ दिवस अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग पुन्हा एकदा प्रभावित होणार असून या संबंधित भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोणत्या जिल्ह्यात बरसणार ?
IMD ने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस होईल असा अंदाज आहे.
तसेच विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावणार असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. तसेच काही भागात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची देखील शक्यता जाणवत आहे.
यामुळे अवकाळी पावसाचे सावट अजूनही पूर्णपणे गेलेले नसून आगामी काही दिवस राज्यात अवकाळी पाऊस बरसणार आहे. यामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांनी अधिक सजग राहणे अपेक्षित असून शेतकऱ्यांनी शेतीपिकांची आणि आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.