Maharashtra Weather Update : गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस सुरू होता. गेल्या महिन्यात राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपीटीची हजेरी लागली. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या एप्रिल महिन्याचा शेवट सुद्धा अवकाळी पावसाने झाला आहे. यामुळे मे महिन्याची सुरुवात कशी होणार याकडे अनेकांचे लक्ष होते.
मे महिन्याच्या सुरुवातीलाही अवकाळी पाऊस पडणार का असा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता. दरम्यान मे महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाचे सावट पूर्णपणे निवळले असल्याचे पाहायला मिळत आहे. काल राज्यातील कोणत्याच जिल्ह्यात पावसाची नोंद करण्यात आलेली नाही.
राज्यातील हवामान कोरडे झाले आहे. विशेष बाब अशी की आज देखील महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता नाहीये. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशातच मात्र आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे वादळी पावसाचे सावट दूर झाले आहे पण राज्यात ठिकठिकाणी उष्णतेची लाट येणार असा अंदाज देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागांमध्ये उष्णतेची लाट येणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. कोकणात उष्ण व दमट हवामान राहणार आहे.
मराठवाड्यात उष्ण रात्रीचा अनुभव येणार आहे. म्हणजेच रात्रीच्या वेळी प्रचंड उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बीड, जळगाव, वर्धा, अकोला, नांदेड अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, सांगली, या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
या सदर जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होणार असून या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे येथील नागरिकांना विशेष सावध राहावे लागणार आहे.
या संबंधीत जिल्ह्यातील नागरिकांनी अतिशय आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडावे अन्यथा घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
एकंदरीत पावसाचे संकट जरी दूर झाले असले तरी राज्यावर उष्णतेचे संकट मात्र कायम राहणार आहे. यामुळे राज्यातील नागरिकांची चिंता वाढणार आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. यामुळे अनेक जण लग्नकार्यासाठी बाहेर पडत आहेत.
अशातच मात्र उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे सांगितले जात आहे. तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने धरणांमधील पाण्याचा साठा जलद गतीने कमी होत चालला आहे.
वाढत्या उष्णतेमुळे जलद गतीने बाष्पीभवन होत आहे. परिणामी आगामी काळात पाण्याचे संकट आणखी गडद होणार अशी भीती व्यक्त केली जात असून पिण्याच्या पाण्याचे देखील हाल होतील ही शक्यता नाकारून चालणार नाही.