Maharashtra Weather Update : गेली अनेक दिवस पावसाने महाराष्ट्राकडे पाठ फिरवली होती. महाराष्ट्रात संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडाच राहिला. कोणत्याच जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस पडला नाही. यामुळे सर्वांचीच काळजाची धडधड वाढलेली होती. पण सप्टेंबर महिन्याची सुरुवात महाराष्ट्रासाठी आशादायी राहिली आहे.
कारण की या महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाचे पुनरागमन झाले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या धो धो पाऊस कोसळत आहे. सध्या पडत असलेल्या पावसामुळे खरिपातील पिकांना नवीन जीवदान मिळणार अशी आशा व्यक्त केली जात आहे.
यामुळे साहजिकच बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. विशेष बाब अशी की आगामी काही दिवस राज्यात असाच पाऊस बरसत राहणार आहे. पुढील चार दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने याबाबतचा सविस्तर अंदाज नुकताच निर्गमित केला आहे. या नवीन हवामान अंदाजानुसार, उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आणि उत्तर कर्नाटकात नवीन चक्रीवादळ निर्माण झाले आहे. हे दोन घटक सध्या महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान तयार करत आहेत.
या घटकांमुळे राज्यात आता पावसाची तीव्रता वाढणार आहे. याच्या प्रभावाने आता राज्यातील काही जिल्ह्यात धो-धो पाऊस बरसणार असा अंदाज आहे. आज पासून सात सप्टेंबर पर्यंत राजधानी मुंबई आणि लगतच्या परिसरात हलका ते मध्यम पाऊस होणार असा अंदाज आहे.
तसेच उद्यापासून अर्थातच 5 सप्टेंबर ते सात सप्टेंबर दरम्यान राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या तीन विभागात चांगला समाधानकारक पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील जवळपास 22 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.
कोणत्या जिल्ह्यात पडणार जोरदार पाऊस?
उद्या अर्थातच पाच सप्टेंबरला राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या तीन जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय उद्या मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात पाऊस पडणार असा अंदाज आहे. या सोबतच मराठवाड्यातील नांदेड, लातूर या दोन जिल्ह्यात पावसाचा अंदाज असून विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात पाऊस पडणार असल्याचे सांगितले जात आहे.
6 सप्टेंबरला उत्तर कोकणातील ठाणे, दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर, विदर्भातील भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
7 सप्टेंबरला उत्तर कोकणातील ठाणे, दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.