Maharashtra Weather Update : काल सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली. पण सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हिटसारख्या उन्हाच्या झळा जाणवत आहेत, या झळा भर पावसाळ्यात चांगल्याच तापदायक ठरत आहेत. राज्यात जवळपास एका महिन्यापासून पावसाने उघडीप दिली आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या 40% पाऊस झाला आहे. यामुळे खरीप हंगामातील पिके करपली आहेत.
त्यामुळे शेतकरी बांधवांची चिंता वाढत आहे. सध्या शेतकरी बांधव जनावरांच्या चाऱ्यासाठी भटकत आहेत. ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे तेथून आता शेतकऱ्यांनी चारा आणला आहे. पण चाऱ्याचे दरही वाढले आहेत. विहिरीनी तळ गाठला आहे. राज्यातील बहुतांशी धरणे अजूनही पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत.
अशा स्थितीत जर येत्या काही दिवसात पाऊस झाला नाही तर आगामी काळात पिण्याच्या पाण्यासाठी देखील भटकंती करावी लागू शकते. यामुळे सध्या महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. ऑगस्ट महिना कोरडा गेला मात्र आता सप्टेंबर महिन्यात तरी चांगला पाऊस व्हावा आणि राज्यावरील पाणी संकट दूर व्हावे अशी शेतकऱ्यांची आणि सामान्य जनतेची आशा आहे.
मात्र सप्टेंबर महिन्याचा पहिला दिवस कोरडाच गेला आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र मधील 18 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या संबंधित जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून जारी करण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या 11 जिल्ह्यात आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड या 3 जिल्ह्यात तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या 4 जिल्ह्यात आज पावसाची शक्यता आहे.
विजांच्या कडकडाटासह या संबंधीत जिल्ह्यांमध्ये आज पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामानाने खात्याने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर या 18 जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.