Maharashtra Weather Update : गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. पावसाची सक्रियता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान घेऊन आली आहे. गेली अनेक दिवस पावसाचा खंड होता यामुळे शेतकरी संकटात आले होते.
मात्र आता पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पावसाचा खंड असल्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात उकाडा वाढला होता मात्र आता पावसाला सुरुवात झाली असल्याने उकाड्यामध्ये घट आली आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने राज्यात आगामी 9 ते 10 दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मुंबई, पुणे, अहमदनगर, नाशिकसह राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा अंदाज आहे. यामुळे खरिपातील पिकांना जीवदान मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. खरंतर संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेला यामुळे खरिपातील पिके संकटात आली होती. अनेक भागात पिके करपली आहेत.
धरणातील पाण्याचा साठा देखील खूपच कमी झाला आहे. विहिरींमध्ये अपेक्षित प्रमाणात पाणी नाहीये. पण आता आगामी काही दिवस पावसाची शक्यता तयार होत असल्याने पाण्याचा प्रश्न निकाली निघणार अशी आशा व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस सर्वत्र पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे.
कोणत्या भागात पडणार पाऊस?
काल भारतीय हवामान विभागाने पावसाबाबतचा आपला नवीन हवामान अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाने बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने याचा प्रभाव म्हणून राज्यात आगामी काही दिवस पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 8 सप्टेंबर पर्यंत राजधानी मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. याशिवाय कोकणातील दक्षिण भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्गात मंगळवार आणि बुधवार हे दोन दिवस पाऊस पडणार असा अंदाज आहे.
तसेच रत्नागिरीमध्ये मंगळवारपासून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातही गुरुवारी आणि शुक्रवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज IMD ने वर्तवला आहे. या व्यतिरिक्त मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे या जिल्ह्यात आजपासून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज आहे.
नासिक तसेच खानदेश मधील धुळे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यात सात सप्टेंबर आणि 8 सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यातही आगामी काही दिवस पाऊस पडणार असा अंदाज आहे.
लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय भारतीय हवामान विभागाने विदर्भातील चंद्रपूर येथे आज आणि उद्या, गडचिरोली येथे आज, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे उद्या जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. एकंदरीत महाराष्ट्रात आगामी काही दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. यामुळे निश्चितच राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.