Maharashtra Women Scheme : केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून देशभरातील महिलांसाठी कायमचं नाविन्यपूर्ण योजना सुरू केल्या जातात. महिलांचे भवितव्य उज्वल व्हावे यासाठी शासनाकडून नेहमीच अभिनव उपक्रम राबवले जातात.
खरंतर, आपला देश वेगाने विकसित होत आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. आगामी काही वर्षात भारताची अर्थव्यवस्था ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असा दावा अर्थशास्त्रज्ञांनी केला आहे.
मात्र या जगातील वेगाने विकसित होत असलेल्या देशात अजूनही बालमृत्यूचे प्रमाण हे कमी झालेले नाही. शिवाय कुपोषण देखील आपल्या देशातुन अद्यापही पूर्णपणे बेदखल झालेले नाही. शिवाय गरोदरपणातही महिलांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होतोय.
अशा परिस्थितीत माता मृत्यू दरात आणि बालमृत्यू दरात घट घडवून आणण्यासाठी तसेच कुपोषणाला आळा घालण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही देखील अशीच एक योजना आहे.
या योजनेच्या माध्यमातून देशभरातील गरोदर आणि स्तनदा मातांना आर्थिक लाभ दिला जात आहे. या आर्थिक लाभातून गरोदर आणि स्तनदा मातांना आपल्या आरोग्यावर तसेच नवजात बालकाच्या आरोग्यावर खर्च करता येतो. त्यामुळे त्यांना चांगले पोषण मिळते.
किती लाभ मिळतो?
या योजनेच्या माध्यमातून गरोदर महिलांना पाच हजार रुपयांचा लाभ मिळतो. तसेच जननी सुरक्षा योजनेअंतर्गत अतिरिक्त 1000 रुपये मिळतात. म्हणजे एकूण सहा हजार रुपयांचा लाभ गरोदर महिलांना मिळतो.
या महिलांना लाभ मिळत नाही
या योजनेअंतर्गत 19 वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेल्या गरोदर महिलांनाच लाभ मिळतो. म्हणजेच 19 वर्ष पेक्षा कमी वय असलेल्या गरोदर महिलांना याचा लाभ दिला जाऊ शकत नाही. सरकारी नोकरी करणाऱ्या गरोदर महिलांना याचा लाभ मिळत नाही. वेतनासह मातृत्व रजा ज्या महिलांना मिळते अशा कोणत्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
अर्ज कुठं करणार
महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन किंवा अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्रात भेट देऊन या योजनेच्या लाभासाठी अर्ज करता येतो.