Makarand Anaspure On Farmer : भारत हा शेतीप्रधान देश आहे. आपल्यापैकी अनेकांचे कुटुंब शेतीशी निगडित असेल, काहीजण स्वतः शेती करत असतील. तर काही लोकांचे पूर्वज शेतीशी संबंधित असतील. म्हणजेच जवळपास प्रत्येकाचाच केव्हा ना केव्हा शेतीशी संबंध राहिलेला आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था देखील शेतीवर अवलंबून आहे.
खरंतर पूर्वी शेतीचा व्यवसाय हा खूपच आव्हानात्मक होता. संसाधनांची कमी होती. शेतीची कामे बैलजोडीच्या साहाय्याने करावी लागत असत. आता मात्र काळाच्या ओघात शेतीत बदल झाला आहे.शेतीमध्ये ट्रॅक्टर सारख्या यंत्रांचा वापर वाढू लागला आहे. दरम्यान, शासनाने देखील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले आहे. अशातच आता जेष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांना एक कानमंत्र दिला आहे.
त्यांनी ट्रॅक्टर खरेदी करण्याबाबत शेतकऱ्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. खरे तर येत्या दोन दिवसात अर्थातच 26 जानेवारी 2024 ला मकरंद अनासपुरे यांचा नवरदेव बीएससी ऍग्री हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन राम खाटमोडे यांनी केले आहे.
क्षितिश दाते आणि प्रियदर्शनी इंदलकर यांनी मकरंद अनासपुरे यांच्या समवेत या चित्रपटात प्रमुख भूमिका निभावलेली आहे. याशिवाय अनेक कलाकार या चित्रपटात पाहायला मिळतील. शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीयेत हे विदारक दृश्य या चित्रपटातून समाजापुढे मांडण्याचे काम या गुणी कलाकारांनी केले आहे.
दरम्यान या चित्रपटासाठी आता मकरंद अनासपुरे देखील जोरदार प्रमोशन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. याचं प्रमोशनसाठी मकरंद अनासपुरे यांनी सौमित्र पोटे यांच्या पॉडकास्टला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत मकरंद अनासपुरे यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.
या मुलाखतीत अनासपुरे यांनी “माझं असं वैयक्तिक मत आहे की, ज्याची २ एकर शेती आहे त्याला वैयक्तीक ट्रॅक्टर कशाला पाहिजे ? खरेतर ट्रॅक्टर खरेदीवर तुम्हाला एक लाखाची सबसिडी दिली जाते, पण ते एक लाख मिळवण्यासाठी तुम्ही ५ लाखांचं लोन घेता.
पण, मग तुम्हाला २ एकरासाठी ट्रॅक्टर कशाला पाहिजे. ” म्हणजेच मकरंद अनासपुरे यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांना एकट्याने ट्रॅक्टर घेऊ नये असा सल्ला दिला आहे. परंतु त्यांनी ट्रॅक्टरचा वापर करायचाच नाही असे म्हटलेले नाही.
ते म्हणतात की, अल्पभूधारक शेतकऱ्याने एकट्याने ट्रॅक्टर घेण्याऐवजी ५ शेतकरी एकत्र येऊन ट्रॅक्टर घेतले पाहिजे. असे केल्यास ट्रॅक्टरसाठीचे ५ लाखांचं लोन ५ जणांमध्ये विभागले जाईल. यामुळे शेतकरीबांधव कर्जबाजारी होणार नाहीत. शिवाय त्यांना गरजेच्या वेळी हक्काचा ट्रॅक्टरही उपलब्ध होणार आहे. असे केल्यास कमी पैशात त्यांना ट्रॅक्टरचा उपयोग घेता येणार आहे.
पुढे बोलताना त्यांनी जर 20 शेतकरी एकत्र आलेत आणि ट्रॅक्टर घेतला तर प्रत्येक शेतकऱ्याला येणारी कर्जाची रक्कम ही खूपच कमी होईल असे म्हटले आहे. तसेच जर 20 शेतकरी एकत्र आले तर मजूरटंचाईचा देखील सक्षमपणे सामना करता येईल आणि मजुरांसाठी अधिकचा पैसा खर्च करावा लागणार नाही असे देखील म्हटले आहे.
निश्चितच ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी ट्रॅक्टर संदर्भात मांडलेले आपले हे मत शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणार आहे. जर शेतकऱ्यांनी अशा तऱ्हेने धोरणात्मक निर्णय घेतलेत तर त्यांना शेतीमधून चांगली कमाई करता येणार आहे शिवाय त्यांना अधिकचा पैसा देखील खर्च करावा लागणार नाही.