Mansoon 2024 : गेल्या पाच-सहा दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे सत्र पाहायला मिळत आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. रब्बी हंगामातील हार्वेस्टिंगसाठी तयार शेती पिकांना या वादळी पावसाचा मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
विशेष म्हणजे सध्याच्या या मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे आगामी मान्सूनवर तर विपरीत परिणाम होणार नाही ना हा सवाल देखील शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
खरे तर गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात सरासरीपेक्षा कमी पावसाची हजेरी लागली होती. परिणामी हिवाळ्यापासूनच आपल्या राज्यातील काही भागांमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
सध्या स्थितीला राज्यातील अनेक धरणांनी तळ गाठला आहे. विहिरी कोरड्याठाक झाल्या आहेत. यामुळे यंदाचा मान्सून कसा राहणार हा मोठा सवाल आहे.
दरम्यान अमेरिकेतील नॅशनल ओशनिक अॅण्ड एटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन आणि देशातील स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने यंदाचा मान्सून कसा राहणार याबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.
यानुसार गेल्या मान्सून काळात ज्या एल निनोमुळे पाऊस कमी झाला होता त्याचा प्रभाव आता कमी-कमी होत चालला आहे. विशेष म्हणजे एल नीनोचा प्रभाव हा जूनच्या अगोदरच संपुष्टात येणार अशी शक्यता या संस्थेने व्यक्त केली आहे.
दुसरीकडे, ज्या घटकामुळे भारतात नैऋत्य मान्सून काळात समाधानकारक असा पाऊस पडतो तो घटक आता सक्रिय होत आहे. ला निनोचा प्रभाव आता वाढत असून, तो जूनपासून सक्रिय होईल, असा अंदाज देण्यात आला आहे.
परिणामी, यंदा मान्सून लवकर येण्याची शक्यता असून, पाऊसही चांगला होईल, असं म्हटल जात आहे. हवामान तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे इंडियन ओशियन डायपोल आणि ला निना हे दोन्हीही घटक मानसूनसाठी अनुकूल राहणार आहेत.
मान्सून काळात इंडियन ओशियन डायपोल पॉझिटिव्ह राहील आणि ला निना देखील सक्रिय राहणार आहे यामुळे यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच यंदा पाऊसमान देखील सरासरी पेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. खरे तर महाराष्ट्रात सात जूनला मान्सूनचे आगमन होते.
सात जूनला राज्यातील तळकोकणात मान्सून दाखल होतो आणि त्यानंतर मग मुंबईमध्ये दाखल होतो. मान्सून मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर मग तेथून मान्सून संपूर्ण राज्यभर पसरतो. यंदा मात्र मान्सून वेळेआधीच दाखल होणार असे बोलले जात आहे. असे झाल्यास निश्चितच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.