Mazi Ladki Bahin Yojana : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात फक्त एकाच गोष्टीची चर्चा आहे आणि ती चर्चा सुरू आहे लाडकी बहिण योजनेची. अगदी गाव खेड्यापासून ते मंत्र्यांच्या एसी ऑफिसपर्यंत सर्वत्र या योजनेची चर्चा आहे. राज्य शासनाची ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून याची घोषणा नुकत्याच काही दिवसांपूर्वी झाली आहे.
अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा झाली आणि लगेचच या योजनेचा जीआर निघाला. सध्या यासाठी अर्ज भरणे सुरू आहे. एक जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून 31 ऑगस्ट पर्यंत इच्छुकांना अर्ज करता येणार आहेत. याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत.
म्हणजेच जी महिला या योजनेसाठी पात्र ठरेल त्या महिलेला एका वर्षात 18,000 रुपये मिळणार आहेत. याचा लाभ 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना होणार आहे. वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
फक्त राज्यातील महिलाच यासाठी पात्र ठरणार आहेत. तथापि ज्या महिला परराज्यात जन्मलेल्या आहेत आणि ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले आहे अशा महिला यासाठी पात्र ठरणार आहेत.
खरंतर ही योजना सुरू झाली त्यावेळी योजनेच्या अटी आणि शर्ती खूपच कठोर होत्या. यामुळे या योजनेच्या अटी शिथिल झाल्या पाहिजेत अशी मागणी केली जात होती. दरम्यान याच मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने या योजनेच्या अनेक अटी शिथिल केल्या आहेत.
आता राज्यातील परप्रांतीय महिलांनाही याचा लाभ मिळणार आहे. यासाठी सरकारने काही नियम सुद्धा शिथिल केलेत. यानुसार, आता ज्या महिलांकडे रेशनकार्ड नाही त्यांना देखील याचा लाभ मिळू शकणार आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ परप्रांतीय बहिणींना मिळावा, यासाठी सरकारने मोठा निर्णय घेत नियमात बदल केल्याची माहिती स्वतः शिवसेना नेते संजय निरुपम यांनी दिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये परप्रांतीय महिलांसाठी विशेष प्राधान्य आहे.
ज्या महिला बाहेरून आल्या आहेत, ज्यांच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा राशन कार्ड नसेल तर त्यांच्या पतीकडे संबंधित डॉक्युमेंट असल्यास त्यांना ही योजना लागू होणार अशी माहिती आता समोर आली आहे.
अर्थातच आता महिलांकडे रेशन कार्ड नसेल तरीही त्यांना याचा लाभ मिळू शकणार आहे मात्र यासाठी संबंधित महिलांना त्यांच्या पतीचा तत्सम पुरावा सादर करावा लागणार आहे. नक्कीच त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत या योजनेसाठी पुणे जिल्ह्यात नऊ लाखाहुन अधिक अर्ज सादर झाले आहेत.
या योजनेचे 19 ऑगस्टला म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी पैसे जमा केले जाणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे या दिवशी जमा होणार अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी मोठी भेट मिळणार आहे.