Mhada House Lottery : अलीकडे घरांच्या किमती आकाशाला गवसणी घालत आहेत. जमिनीचे वाढलेले दर, बिल्डिंग मटेरियलच्या वाढलेल्या किमती, वाढती महागाई, पेट्रोल डिझेलचे वाढते दर, वाढलेले मजुरीचे दर इत्यादी घटकांमुळे घरांच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक नेहमीच म्हाडा आणि सिडकोच्या घरांना प्राधान्य दाखवतात.
म्हाडा आणि सिडको सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या दरात घरांची निर्मिती करतात. दरम्यान म्हाडा प्राधिकरणाच्या माध्यमातून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर प्राधिकरणाने विरार बोळींज या गृहप्रकल्पातील घराच्या विक्रीसंदर्भात हा निर्णय घेतला आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की या गृह प्रकल्पातील हजारो घरे अजूनही विक्री विना पडून आहेत. या गृहप्रकल्पाला पाण्याची सुविधा नसल्याने आणि कनेक्टिव्हिटीची देखील चांगली सुविधा नसल्याने नागरिकांनी या घरांकडे पाठ फिरवली आहे. यामुळे म्हाडाचा मोठा पैसा मात्र अडकून पडला आहे.
हेच कारण आहे की आता म्हाडा प्राधिकरणाने या गृह प्रकल्पातील शिल्लक राहिलेल्या घरांच्या विक्री संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आता या गृहप्रकल्पातील घरांसाठी कोणताही अर्जदार फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड दाखवून घर खरेदी करू शकणार आहेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आतापर्यंत म्हाडाचे घर घेण्यासाठी अर्जदाराला पॅनकार्ड, आधार कार्ड तसेच अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, प्रतिज्ञापत्र आणि आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जात प्रमाणपत्र सादर करावे लागत होते.
मात्र वारंवार सोडत काढूनही विरार बोळींजमधील घरांची विक्री होत नसल्याने म्हाडाने आता अवघे दोन कागदपत्र सादर केली तरी या गृहप्रकल्पातील घरे नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. विरार संकुलात म्हाडाची सुमारे पाच हजार घरे आहेत.
या 5 हजार घरांच्या विक्रीसाठी म्हाडाच्या कोकण मंडळाने अनेक वेळा लॉटरी काढली, लॉटरीत त्यांचा समावेश करूनही म्हाडाला ही घरे विकता आली नाहीत. यानंतर म्हाडाने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या योजनेअंतर्गत विरारमधील घरे विकण्याचा प्रयत्न केला.
म्हाडाला या योजनेतुनही ही घरे विकता आली नाहीत. खरंतर या गृहप्रकल्पात वन बीएचके घरांची किंमत 22 लाख आणि टू बीएचके घरांची किंमत 44 लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.
म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पॅन कार्ड आणि आधार कार्ड असलेला कोणताही अर्जदार या विक्री विना शिल्लक असलेल्या घरांसाठी अर्ज करू शकतो.
पैसे जमा केल्यानंतर दोन आठवड्यांत घराच्या चाव्या अर्जदाराच्या ताब्यात देण्यात येतील. या गृहप्रकल्पातील घर घेण्यासाठी अर्जदार म्हाडाच्या वेबसाइटवरून अर्ज करू शकतात.