Mhada Lottery 2023 : अलीकडे मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रात घरांच्या किमती खूपच वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य लोक मुंबई व मुंबई महानगरक्षेत्र अर्थातच एम एम आर क्षेत्रात घर घेण्यासाठी नेहमीच म्हाडा व सिडकोच्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात.
म्हाडा व सिडकोकडून उपलब्ध होणाऱ्या परवडणाऱ्या घरांची खरेदी करून आत्तापर्यंत हजारो लोकांनी आपल्या स्वप्नातील घरांची स्वप्नपूर्ती केली आहे. अशातच म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
म्हाडा कोकण मंडळाकडून लवकरच पाच हजार 309 घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे. लॉटरी नोव्हेंबर महिन्यात निघणार असून यासाठीची जाहिरात उद्या अर्थातच 15 सप्टेंबर 2023 रोजी निर्गमित केली जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठीची अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया देखील जाहिरात निघेल त्याच दिवसापासून सुरु केली जाणार आहे.
यामुळे मुंबई महानगर क्षत्रात घर घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की कोकण मंडळाने मे 2023 मध्ये 4654 घरांसाठी लॉटरी काढली होती. मात्र या लॉटरीला नागरिकांनी अपेक्षित असा प्रतिसाद दाखवला नाही.
या लॉटरीतील बहुतांशी घरे विकली गेली नाहीत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेअंतर्गत समाविष्ट असलेली घरे आणि म्हाडा गृहनिर्माण योजनेतील अनेक घरांना नागरिकांनी प्रतिसाद दाखवला नाही. यातील बहुतांशी घरे गेल्या लॉटरीत विकली गेली नाहीत. यामुळे कोकण मंडळाला मोठा फटका बसला.
परिणामी मंडळाच्या माध्यमातून गेल्या लॉटरीत विकली न गेलेली घरे आणि विविध गृहनिर्माण योजनेतून उपलब्ध झालेल्या घरांसाठी आता पुन्हा एकदा लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. या लॉटरीची जाहिरात आता उद्या प्रसिद्ध होणार आहे. यासाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया देखील उद्यापासूनच सुरू होणार आहे.