Mhada Lottery 2023 : मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईत गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या किमती अव्वाच्या-सव्वा बनल्या आहेत. अशा परिस्थितीत राजधानीत घर घेणं म्हणजे आता अवघड बाब बनत चालली आहे. यामुळे मुंबईमध्ये घर घेण्यासाठी म्हाडाच्या घरांना पसंती दाखवली जात आहे.
यासाठी मुंबई मंडळाच्या लॉटरीला नेहमी लाखोंच्या संख्येने अर्ज दाखल होतात. दरम्यान म्हाडा मुंबई मंडळांने चार हजार 82 घरांसाठी सोडत काढली आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र म्हाडाच्या घरांच्या किमती या लॉटरीत खूपच वाढल्या आहेत.
यामुळे या घर सोडतिला अपेक्षित असा प्रतिसाद नागरिकांनी दाखवलेला नाही. अजूनही मुंबई मंडळाच्या घर सोडतीला एक लाख अर्ज आलेले नाहीत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आत्तापर्यंत मुंबई मंडळाने जेवढ्या लॉटऱ्या काढल्या आहेत त्या लॉटरीला नेहमीच दोन ते तीन लाखांच्या दरम्यान अर्ज आले आहेत.
यंदाच्या म्हणजे 2023 च्या सोडतीत मात्र 59,804 अर्ज सादर झाले आहेत. विशेष म्हणजे यापैकी केवळ 46,000 अर्जदारांनी अनामत रक्कमेसह आपला अर्ज सादर केला आहे. अशा परिस्थितीत आता म्हाडा मुंबई मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई मंडळाच्या चार हजार 82 घरांसाठी अर्ज प्रक्रियेला जवळपास पंधरा दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. आधी 26 जून 2023 पर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. मात्र आता ही मुदत 10 जुलै 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
गुरुवारी याबाबत म्हाडाकडून माहिती देण्यात आली आहे. निश्चितच मुंबई मंडळाच्या घर सोडतीसाठी अर्ज प्रक्रियेला पंधरा दिवसांची मुदत वाढ मिळाली असल्याने अर्जदारांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान मुंबई मंडळाच्या घरांसाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कुठं आहेत घरे
मुंबई मंडळाने 2023 च्या लॉटरीत चार हजार 82 घरांचा समावेश केला आहे. ही घरे विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आली आहेत. यामध्ये अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथील घरांचा समावेश करण्यात आला आहे.