Mhada Mumbai News : महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थातच म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खरेतर, गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत.
मुंबई, पुणे यांसारख्या महानगरांमध्ये घर घेणे ही बाब सर्वसामान्यांच्या स्वप्नापल्याडची झाली आहे. अशा परिस्थितीत मात्र म्हाडाची परवडणाऱ्या दरातील घरे सर्वसामान्यांसाठी फायद्याची ठरत आहेत.
म्हाडामुळे आतापर्यंत हजारो लोकांचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अशातच आता म्हाडा मुंबई मंडळ लवकरच काही घरांसाठी लॉटरी जाहीर करणार असे वृत्त समोर आले आहे.
यामुळे जर तुम्हीही मुंबई मंडळातील घरांची वाट पाहत असाल तर तुम्हाला आत्तापासूनच पैशांची जमवाजमव करावी लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई मंडळ सप्टेंबरमध्ये सुमारे दोन हजार घरांसाठी लॉटरी काढणार आहे.
याबाबत म्हाडा मुंबई मंडळाकडून अधिकृत माहिती समोर आलेले नाही मात्र काही मीडिया रिपोर्ट मध्ये असा दावा केला जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार म्हाडाच्या या आगामी सोडतीत गोरेगाव येथील आधुनिक इमारतीतील सुमारे ३३२ घरांचाही समावेश होणार आहे.
या गृहप्रकल्पातील ही घरे उच्च व मध्यमवर्गीय लोकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यात उच्च वर्गाची घरे सुमारे 979 चौरस फूट क्षेत्रफळाची आणि मध्यमवर्गीय घरे सुमारे 714 चौरस फूट क्षेत्रफळाची राहणार आहेत.
यातील उच्चवर्गीय घरांची किंमत अंदाजे 1.25 कोटी रुपये राहू शकते आणि मध्यमवर्गीय घरांची किंमत अंदाजे 80 लाख रुपयाच्या घरात राहणार असा दावा केला जात आहे. या घरांचे जवळपास 80% काम पूर्ण झाले आहे.
येत्या दोन ते अडीच महिन्यांत घरे तयार होतील. अर्थातच या गृहप्रकल्पातील घरांची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. यामुळे सप्टेंबर मध्ये या घरांसाठी लॉटरी जाहीर होऊ शकते असा अंदाज आहे.
म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील विविध भागातील तयार घरांची माहिती गोळा केली जात आहे. मुंबईत येत्या काही महिन्यांत जवळपास 2 हजार घरे तयार होण्याची अपेक्षा आहे.
त्यामुळे या घरांची लॉटरीसाठी निवड केली जाणार आहे. एवढेच नाही तर मुंबई मंडळाच्या गेल्या लॉटरीतल्या ज्या घरांची विक्री झालेली नाहीये त्या घरांना देखील आगामी सोडतीत समाविष्ट केले जाणार आहे.