Mhada News : अलीकडे घरांचा किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. विशेष म्हणजे घरांच्या किमती आगामी काळात आणखी वाढतील असा अंदाज आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना घर घेणे आता अवघड होऊ लागले आहे.
यामुळे सर्वसामान्य लोक घरांच्या स्वप्नपूर्तीसाठी म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान, म्हाडा कोकण मंडळाने सप्टेंबर 2023 मध्ये 5311 घरांसाठी लॉटरी प्रक्रिया जाहीर केली होती.
सप्टेंबर 2023 मध्ये या घरांसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. 15 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या या अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रिया अंतर्गत 30,687 लोकांनी अर्ज केले होते.
यापैकी जवळपास 24 हजार 300 अर्जदारांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केला आहे. मात्र अद्याप या सोडतीची ऑनलाईन संगणकीय लॉटरी काढण्यात आलेली नाही.
यामुळे कोकण मंडळाची लॉटरी केव्हा निघणार हाच सवाल अर्जदारांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून उपस्थित केला जात आहे. अशातच कोकण मंडळाच्या या लॉटरी संदर्भात एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे.
खरंतर या सोडतीची ऑनलाईन लॉटरी 13 डिसेंबर 2023 ला काढली जाणार होती. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ही लॉटरी नियोजित वेळेत काढली जाऊ शकली नाही.
ही लॉटरी डिसेंबर अखेरपर्यंत निघेल अशी आशा होती. मात्र डिसेंबर अखेरीस देखील या लॉटरीला मुहूर्त सापडला नाही. यामुळे अर्जदारांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे.
कोणत्या घटकासाठी किती घरे?
या कोकण मंडळाच्या नव्या लॉटरी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 1010 घरे, एकात्मिक गृहनिर्माण योजनेंतर्गत 1037 घरे, सर्वसमावेशक योजनेंतर्गत 919 घरे, टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनसाठी 64 घरे अशा एकूण पाच हजार 311 घरांचा समावेश आहे. ही घरे ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत.
केव्हा निघणार लॉटरी?
म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल हे कोकण मंडळाच्या घरांसाठी लॉटरी केव्हा काढायची याबाबत निर्णय घेणार आहेत. यासाठी उपाध्यक्ष एक महत्त्वाची बैठक घेतील आणि या बैठकीतच याबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या सोडतीसाठी अर्ज सादर केलेल्या अर्जदारांना एसएमएस करून लॉटरीचा दिनांक कळवला जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार जानेवारी अखेरपर्यंत या लॉटरीला मुहूर्त मिळू शकतो. यामुळे आता प्रत्यक्षात या सोडतीची लॉटरी केव्हा निघणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.