Modi Government : येत्या तीन दिवसात महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात नवरात्र उत्सवाचा पावन पर्व सुरू होणार आहे. नवरात्र उत्सवाचा हा आनंददायी सणं यंदा 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर दरम्यान सेलिब्रेट केला जाणार आहे. नवरात्र उत्सव आणि विजयादशमीचा सण साजरा झाल्यानंतर मग दिवाळीचा मोठा सण संपूर्ण देशात साजरा होणार आहे.
दरम्यान दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकार देशभरातील शेतकऱ्यांसाठी, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेणार असल्याचे एक मोठे वृत्त समोर आले आहे. खरंतर दिवाळी सणानंतर देशात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे.
यामुळे निवडणुकीचे पडघम देखील वाजू लागले आहेत. या चालू वर्षाच्या अखेरीस काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे तर पुढल्या वर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका राहणार आहेत. परिणामी दिवाळी सणाला केंद्र शासनाच्या माध्यमातून काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार देशातील सर्वसामान्य जनतेसाठी, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी दिवाळीच्या काळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. यामध्ये भाडेकरूंना दिलासा देण्यासाठी आवास निधी योजनेची सुरवात केली जाणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ केली जाणार आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाणार आहे, सोबतच त्यांना बोनसही मिळणार आहे. खरंतर याबाबत काल अर्थातच 11 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतच निर्णय घेतला जाणार होता. परंतु दिवाळीचा सण पाहता याबाबतचा निर्णय पुढल्या महिन्यात घेतला जाऊ शकतो असे सांगितले जात आहे.
पीएम किसान योजनेच्या रकमेत होणार इतकी वाढ
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकार पीएम किसान योजनेच्या रकमेत दुप्पट वाढ होणार आहे. सध्या पीएम किसानच्या लाभार्थ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात. मात्र यामध्ये आणखी सहा हजार रुपयांची भर घातली जाणार आहे.
म्हणजेच पीएम किसान योजनेअंतर्गत आता वार्षिक 12,000 रुपये दिले जाऊ शकतात. याबाबतचा निर्णय पुढल्या महिन्यात होऊ शकतो असे देखील सांगितले जात आहे. तूर्तास मात्र शासनाकडून याबाबत कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होणार इतकी वाढ
सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. जानेवारी महिन्यापासून हा दर लागू झाला आहे. मात्र आता जुलै महिन्यापासूनच्या महागाई भत्त्यात सुधारणा केली जाणार आहे. महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांना 45 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. याबाबतचा निर्णय पुढल्या महिन्यात होणार असून या निर्णयाची अंमलबजावणी मात्र एक जुलै 2023 पासून होणार आहे. याचाच अर्थ एक जुलै 2023 पासूनची महागाई भत्ता थकबाकीची रक्कम देखील सरकारी कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांना बोनसही मिळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
देशातील भाडेकरूंसाठी देखील घेणार मोठा निर्णय
केंद्र शासन देशभरातील दहा कोटी पेक्षा अधिक भाडेकरूंसाठी एक मोठा निर्णय घेणार आहे. भाडेकरूंच्या घर खरेदिसाठी आवास निधी योजना राबवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेचे स्वरूप कसे राहील याबाबत अद्याप माहिती हाती आलेली नाही परंतु लवकरच याविषयी सविस्तर अशी माहिती पुढे येणार आहे.
याव्यतिरिक्त देशभरातील महिलांसाठी आकर्षक योजना सुरू केल्या जाणार आहेत. एकंदरीत यंदाची दिवाळी ही सर्वसामान्य जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी अच्छे दिन घेऊन येणार असल्याचे चित्र तयार होत आहे.