Monsoon 2024 : एप्रिल महिन्याला सुरुवात होऊन आता एक आठवडा उलटला आहे. येत्या काही दिवसांनी आता उन्हाळा जाईल अन पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसहित संपूर्ण देशभरातील नागरिकांचे आगामी मान्सूनकडे लक्ष लागले आहे.
गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत राज्यात खूपच कमी पाऊस झाला, यामुळे शेतकरी संकटात आलेत. यंदा मात्र महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभर चांगल्या मान्सूनची शक्यता वर्तवली जात आहे.
अनेक जागतिक हवामान संस्थांनी तसेच स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने यावर्षी भारतात चांगला मान्सून राहणार, मान्सून काळात चांगला पाऊस बरसणार असा अंदाज दिला आहे.
अशातच मात्र ज्योतिषशास्त्र यंदाच्या पावसाळ्या बाबत काय संकेत देत आहे ? याबाबत जाणून घेण्याची देखील अनेकांमध्ये उत्सुकता असल्याचे पाहायला मिळत आहे. दाते पंचांगात यंदाच्या पावसाळ्याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. यानुसार यंदा मुबलक पाऊस राहणार असा अंदाज देण्यात आला आहे.
मान्सून आगमन केव्हा होणार ?
दाते पंचांगानुसार, यंदा मान्सूनचे महाराष्ट्रात 10 जूनच्या सुमारास आगमन होण्याची दाट शक्यता आहे. मान्सून सुरू झाल्यानंतर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मुबलक पाऊस होणार असे म्हटले जात आहे.
या पंचांगात यावर्षी अर्थातच 2024 च्या पावसाळ्यात २२ जून ते १० ऑगस्ट या कालावधीत मुबलक पर्जन्यवृष्टी होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे यंदा पर्जन्यमान अधिक राहणार असल्याने राज्यातील काही भागात जनजीवन सुद्धा विस्कळीत होईल असे भाकित यावेळी वर्तवण्यात आले आहे.
दुसरीकडे १० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर 2024 यां कालावधीत पर्जन्यमान मध्यम राहणार असे यात नमूद करण्यात आले आहे. तसेच यंदा २० सप्टेंबरपासून पाऊस माघारी परतणार, पावसाचा जोर कमी होणार आहे.
२० ऑक्टोबरपर्यंत सरासरीइतकाचा पाऊस होणार अशी शक्यता यामध्ये वर्तवण्यात आली आहे. पुढे १ ते १५ नोव्हेंबर या काळात अपेक्षित पाऊस होऊ शकतो असेही मोठे भाकीत यात वर्तवण्यात आले आहे. एकंदरीत यावर्षी चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
निश्चितच जर दाते पंचांगानुसार यावर्षी चांगला पाऊस झाला तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. चांगला समाधानकारक पाऊस झाला तर यंदा पिक पाणी चांगले राहिल आणि यामुळे अर्थव्यवस्थेला देखील मोठा बूस्ट मिळणार आहे.
दुसरीकडे यावर्षी चांगला पाऊस होऊ शकतो अशी शक्यता अनेक हवामान तज्ञांनी देखील वर्तवलेली आहे. यामुळे यंदा शेतकऱ्यांना आनंदाचे दिवस येतील अशी आशा आहे. पाऊसमान चांगला राहिला तर शेतकऱ्यांसाठी हे अच्छे दिन राहतील.