Monsoon 2024 : भारतीय हवामान विभागाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी यावर्षी मान्सून काळात अर्थातच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात समाधानकारक पाऊस पाहायला मिळणार असा अंदाज दिला आहे. विशेष बाब अशी की, काही हवामान तज्ञांनी यंदा मान्सूनचे आगमन वेळेआधीच होऊ शकते असा अंदाज देखील दिला आहे.
17 ते 18 मे च्या सुमारास अंदमानाच्या समुद्रात मान्सूनचे आगमन होणार असे म्हटले जात आहे. तत्पूर्वी मात्र राज्यात मान्सूनपूर्व पावसाचे सत्र सुरु झाल्याचे चित्र आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे.
राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये वादळी पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे विदर्भ विभागातील चंद्रपूर जिल्ह्यात काल तुफान गारपीट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सदर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अशा परिस्थितीत पूर्व मौसमी पावसाचे हे सावट आणखी किती दिवस कायम राहणार असा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. दरम्यान याच संदर्भात भारतीय हवामान खात्याने एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज पासून पुढील तीन दिवस राज्यातील काही भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. विशेष म्हणजे आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होणार असा देखील अंदाज आयएमडीने जारी केला आहे.
कोणत्या जिल्ह्यात बरसणार पाऊस?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या पूर्व विदर्भापासून तेलंगणा, अंतर्गत कर्नाटक ते उत्तर तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याचे पाहायला मिळत असून याचा परिणाम हा महाराष्ट्रातील हवामानावर होत आहे.
आज राज्यातील अमरावती, वर्धा नागपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसासह गारपिट होण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातील उर्वरित 8 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्याबाबत बोलायचं झालं तर आज मराठवाड्यातील लातूर, नांदेड, हिंगोली या तीन जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
तसेच मराठवाडा विभागातील हिंगोली, बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव या पाच जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भ विभागातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे सदर भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.