Monsoon 2024 : गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये मान्सून काळात म्हणजेच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात खूपच कमी पाऊस झाला. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली. गेल्यावर्षी पावसाळी काळात कमी पाऊस झाला असल्याने अनेक ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई पाहायला मिळत आहे.
पाणीटंचाई भासत असल्याने शेतकऱ्यांचे तथा मुक्या जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्यावर्षी मानसून वर एल निनोचा प्रभाव होता यामुळे कमी पाऊस झाला आहे. यंदा मात्र परिस्थिती भिन्न राहणार आहे.
मान्सून 2024 या काळात महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सरासरी पेक्षा जास्तीच्या पावसाची शक्यता आहे. यावर्षी मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती तयार होत असल्याने यंदा चांगला पाऊस होणार अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
भारतीय हवामान खात्याने यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज दिला आहे. मात्र, यावर्षी अतिवृष्टी सारखी परिस्थिती पाहायला मिळू शकते आणि यामुळे पूरस्थिती तयार होणार असा अंदाज एका या जागतिक संस्थेच्या माध्यमातून समोर येत आहे.
अमेरिकेतील राष्ट्रीय सागरी आणि वातावरणीय विभागाने नुकताच एक अंदाज वर्तवला आहे. या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार पॅसिफिक महासागरात आता एल निनोचा प्रभाव कमी होईल आणि ला निना सक्रीय होणार आहे. ला निना नैऋत्य मौसमी पावसासाठी खूपच पोषक घटक मानला जातो.
यामुळे आपल्याकडे मान्सून काळात जास्तीच्या पावसाची शक्यता तयार होते. दरम्यान यंदा हाच घटक मान्सूनसाठी अनुकूल असून यामुळे जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
यामुळे देशातील अनेक भागांमध्ये पावसाची तीव्रता अधिक राहणार असून यामुळे पूरसदृश्य परिस्थिती देखील तयार होणार अशी भीती व्यक्त होत आहे. जास्तीच्या पावसामुळे, अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे महापूर येण्याची भीती आहे.
एवढेच नाही तर यामुळे नद्यांमध्ये देखील पावसाचे प्रमाण वाढू शकते आणि नद्या देखील धोक्याची पातळी ओलांडतील असा अंदाज आहे. यामुळे गेल्या वर्षी कोरडा दुष्काळ पडला होता तसा यंदा ओला दुष्काळ पडणार की काय अशी भीती आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त केली जात आहे.