Monsoon 2024 : गेल्या वर्षीच्या मान्सून काळात शेतकऱ्यांना मोठा वाईट अनुभव आला आहे. गेल्यावर्षी जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. महाराष्ट्रासारखीच परिस्थिती देशातील इतर काही राज्यांमध्ये पाहायला मिळाली. याचा फटका शेती क्षेत्राला सर्वाधिक बसला.
खरीप हंगाम हातचा गेला. शेतकऱ्यांना खरीप हंगामातील सोयाबीन कापूस कांदा इत्यादी महत्त्वाच्या पिकांमधून अपेक्षित असे उत्पादन मिळाले नाही. फळ पिकांच्या उत्पादनात देखील मोठी घट पाहायला मिळाली.
यामुळे 2024 मध्ये मान्सून कसा राहणार याच्या चर्चा आतापासूनच पाहायला मिळत आहेत. दरम्यान जागतिक हवामान संस्थांनी याबाबत आत्तापासूनच अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की गेल्या वर्षी मान्सून काळात एलनिनो सक्रिय होता. एलनिनोमुळे भारतातील विविध राज्यांमध्ये कमी पाऊस झाला. विशेष म्हणजे नोव्हेंबर 2023 मध्ये काही जागतिक हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांनी 2024 मध्ये पुन्हा एकदा मान्सूनवर एलनिनोचे संकट राहू शकते असा अंदाज दिला होता.
यामुळे साहजिकच शेतकऱ्यांची चिंता वाढत होती. आता मात्र फेब्रुवारी महिन्यात काही जागतिक हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांनी एल निनो चा प्रभाव हळूहळू कमी होईल आणि ला निना सक्रीय होईल अशी आशा व्यक्त केली आहे.
अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने नुकताच प्रशांत महासागरातील पृष्ठभागावरील तापमानात घट झाल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की जेव्हा प्रशांत महासागरात तील पृष्ठभागावरील तापमान 0.5 अंश सेल्सिअस ने वाढते तेव्हा एलनिनो सक्रिय होत असतो आणि जेव्हा हे तापमान 0.5°c ने कमी होते तेव्हा ला निना सक्रीय होत असतो.
हवामान अभ्यासक सांगतात की एलनिनो मध्ये दुष्काळ पडण्याची भीती असते तर ला निना मध्ये चांगला पावसाळा होतो. दुसरीकडे अमेरिकेच्या नोआ या संस्थेच्या अंदाजानुसार एप्रिल ते जूनच्या दरम्यान एल निनो न्यूट्रल स्थितीत येण्याची शक्यता खूपच अधिक आहे.
तर जून ते ऑगस्टमध्ये ला निना स्थिती तयार होण्याची शक्यता ५५ टक्के एवढी आहे. यामुळे जर एल निनोचा प्रभाव कमी झाला आणि ला निना सक्रिय झाला तर भारतात मॉन्सून काळात चांगला पाऊस पडू शकतो.
निश्चितच असे झाल्यास महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि शेतकऱ्यांना या वर्षी शेती मधून चांगली कमाई होईल अशी आशा आहे. तथापि भारतीय हवामान खात्याचा एप्रिल महिन्यात मान्सून बाबतचा सुधारित अंदाज आल्यानंतरच याबाबत योग्य ती माहिती समोर येऊ शकणार आहे.