Monsoon 2024 : यंदाचा अर्थातच 2023 च्या मान्सून काळात अपेक्षित असा पाऊस झालेला नाही. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, यंदा सरासरीच्या तुलनेत जवळपास 12% कमी पाऊस झाला आहे.
म्हणजे राज्यात फक्त 88% पाऊस बरसला आहे. विशेष म्हणजे यंदाच्या मान्सून काळात पावसाचे असमान वितरण देखील पाहायला मिळाले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले.
सोयाबीन, कापूस, मका यासह विविध पिकांच्या उत्पादनात घट आली. खरे तर मान्सून सुरू होण्यापूर्वीच अमेरिकेच्या हवामान खात्याने 2023 च्या मान्सूनवर एलनिनो परिणाम करणार असा अंदाज वर्तवला होता.
भारतासह संपूर्ण आशिया खंडात यंदा दुष्काळाची झळ पाहायला मिळणार असे अमेरिकन हवामान खात्याने सांगितले होते. भारतीय हवामान विभागाने देखील एलनिनोमुळे देशात सरासरी एवढा किंवा कमी पाऊस राहणार असा अंदाज दिला होता.
पण एल निनोचा मान्सूनवर फारसा विपरीत परिणाम होणार नाही हे आयएमडीने स्पष्ट केले होते. मात्र यंदा एल निनोचा खरचं मोठा विपरीत परिणाम पाहायला मिळाला आहे. राज्य शासनाने राज्यातील बहुतांशी भागासाठी दुष्काळ जाहीर केला आहे. दरम्यान, राज्यात सध्या मान्सूनोत्तर पाऊस सुरु आहे.
गेल्या महिन्यापासून सुरू झालेला हा अवकाळी पाऊस राज्यात हाहाकार माजवत आहे. गेल्या महिन्यात तर उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये गारपीट देखील झाली होती. आज सुद्धा उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामान राहील असा अंदाज आहे.
म्हणजेच पावसाळ्यात महाराष्ट्राकडे पाठ फिरवलेला पाऊस आता महाराष्ट्रावर मेहरबान झाला आहे. यामुळे पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी मोठा मारक ठरत असून या पावसामुळे राज्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे आता पुढील वर्षी देखील पावसाचा लहरीपणा राहणार का, मान्सून 2024 वर एल निनोचा परिणाम राहणार का ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे. तसेच पुढील वर्षी मान्सून काळात पाऊस कसा राहणार याबाबत विचारणा केली जात आहे. दरम्यान, याबाबत हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी महत्त्वाची माहिती दिली.
डॉक्टर महापात्रा यांनी म्हटल्याप्रमाणे, भारतीय मान्सूनवर परिणाम करणारी एल-निनो प्रणाली डिसेंबर 2023 अखेरपर्यंत सक्रीय राहील असा एक अंदाज आहे. तसेच फेब्रुवारी २०२४ नंतर एल-निनो पूर्णतः निष्क्रीय होण्याची प्रक्रिया सुरू होईल असेही त्यांनी म्हटले आहे.
यामुळे पुढील वर्षी येणाऱ्या मान्सूनवर एल निनोचा परिणाम होणार नाही असे महापात्रा यांनी सांगितले आहे. २०२४ च्या मान्सूनवर एल-निनोचा कोणताही परिणाम राहणार नाही. या काळात हिंद महासागरीय द्वि- धुविता (इंडियन ओशन डायपोल) ही निष्क्रीय होईल. त्यामुळे पुढील वर्षी मान्सून हा सामान्य राहील असं बोलले जात आहे. निश्चितच असं झालं तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.