Monsoon New Update : गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या बांधापासून ते मंत्र्यांच्या एसी ऑफिस पर्यंत सर्वत्र मान्सूनच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. भारतीय शेती ही सर्वस्वी मान्सूनवर अवलंबून आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मान्सूनकडे मोठे बारीक लक्ष असते. सरकारचे देखील मान्सूनकडे लक्ष असते. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीसाठी सरकारची आढावा बैठक देखील घेतली जाते. सध्या मान्सून बंगालच्या उपसागरात असून त्याचा पुढील प्रवास वेगात सुरू आहे.
खरंतर मान्सून अंदमानात 19 मेला दाखल झाला आहे. तेव्हापासून मान्सूनचा पुढील प्रवास हा जलद गतीने सुरू असून लवकरच मान्सून आपल्या महाराष्ट्रात दाखल होणार असा अंदाज हवामान खात्यातील तज्ञांनी व्यक्त केला आहे.
यामुळे मान्सूनची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या बळीराजाला लवकरच आनंदाची बातमी मिळणार हे स्पष्ट आहे. खरे तर सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून आपल्या महाराष्ट्रात उष्ण वारे वाहत आहेत.
या उष्ण वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागांमध्ये कमाल तापमान हे जवळपास 46 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. यामुळे उकाड्याने हैराण जनता मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे.
अशातच मान्सून संदर्भात ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी मोठी अपडेट दिली आहे. खुळे यांनी सांगितल्याप्रमाणे, केरळात 31 मे च्या सुमारास मान्सूनचं आगमन होण्याची दाट शक्यता आहे.
तसेच पुढील महिन्यात अर्थातच 10 जूनपर्यंत तो मुंबईसह कोकणात तसेच 15 जून दरम्यान सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून खान्देश, मराठवाडा व विदर्भात येण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
खरे तर दरवर्षी मान्सूनचे 15 जूनच्या सुमारास विदर्भात आगमन होत असते आणि याही वर्षी याच कालावधीत आगमन होण्याची शक्यता हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे.
खुळे यांनी याबाबत अधिक माहिती देताना असे म्हटले की, आज मान्सूनने निम्मा बंगालचा उपसागर क्षेत्र तसेच श्रीलंकेचा भूभागही दोन हिस्याने काबीज केला आहे. तसेच मान्सूनची बंगाल शाखा यंदा लवकर सकिय होणार असे जाणवत आहे.
जर असे झाले तर मध्य महाराष्ट्र व खान्देशात मान्सूनचे आगमन लवकर देखील होऊ शकते असेही यावेळी खुळे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र या साऱ्या गोष्टी जूनमध्ये होणाऱ्या डेव्हलपमेंट वरच अवलंबून राहणार आहेत. म्हणजे याबाबत जून महिन्यातच योग्य ती माहिती समजू शकणार आहे.