Monsoon News : सध्या संपूर्ण देशभरात मान्सूनच्या चर्चा आहेत. शेतकऱ्यांच्या बांधापासून ते मंत्र्यांच्या एसी ऑफिसपर्यंत सगळीकडे मोसमी पावसाच्या चर्चा आहेत. आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून आढावा बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. तसेच शेतकऱ्यांनी देखील खरीप हंगामासाठी शेतीची पूर्व मशागत सुरू केली आहे.
काहींची पूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत तर काहीजण पूर्व मशागतीच्या कामांसाठी शेत शिवारात लगबग करत आहेत. तसेच आगामी खरीप हंगामासाठी बी बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी देखील शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.
अशातच आता मान्सून संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. खरे तर बंगालच्या उपसागरात मान्सूनपूर्व हंगामातील पहिले चक्रीवादळ तयार झाले आहे. या चक्रीवादळाला रेमल असे नाव देण्यात आले आहे.
उत्तर हिंद महासागरातील नावांच्या प्रणालीनुसार हे नाव देण्यात आले आहे. ओमान देशाने चक्रीवादळाला रेमल असे नाव दिले आहे. हे चक्रीवादळ बांगलादेशच्या दिशेने रवाना होणार आहे. पण या चक्रीवादळाचा भारताला देखील फटका बसणार आहे.
देशातील ओडिषा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये या चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस होत आहे. दुसरीकडे चक्रीवादळाचा मान्सूनवर विपरीत परिणाम होणार की काय अशी देखील भीती व्यक्त होत आहे. आता याच संदर्भात नागपूर हवामान विभागाने मोठी अपडेट दिली आहे.
नागपूर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या चक्रीवादळाचा मान्सूनवर फारसा विपरीत परिणाम होणार नाही. मान्सूनसाठी सध्या पोषक परिस्थिती असून लवकरच तो भारताच्या मुख्य भूमीत दाखल होणार आहे.
मान्सूनचे भारताच्या मुख्य भूमीत म्हणजेच केरळमध्ये 31 मेला आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर हवामान विभागाचे संचालक मोहन शाहू यांनी येत्या तीन ते चार दिवसात मान्सूनचे केरळमध्ये आगमन होणार असे म्हटले आहे.
अर्थातच 31 मे पर्यंत मान्सून केरळात येणार आहे. दरवर्षी मान्सूनचे केरळमध्ये एक जूनला आगमन होत असते यंदा मात्र एक दिवस आधीच केरळात मान्सून दस्तक देणार असे चित्र तयार होत आहे.
केरळमध्ये मान्सून आगमन झाल्यानंतर साधारणता एक आठवड्याने आपल्या महाराष्ट्रात मान्सून दाखल होत असतो. दरवर्षी 7 जुनच्या सुमारास महाराष्ट्राच्या मुख्य भूमीत अर्थात तळ कोकणात मान्सूनचे आगमन होते.
यंदा देखील सात जूनच्या सुमारास महाराष्ट्रात मान्सून आगमनाची शक्यता आहे. तळकोकणात दाखल झाल्यानंतर मान्सून अकरा जूनच्या सुमारास मुंबईला पोहचणार आहे आणि पुढे 15 जूनच्या आसपास संपूर्ण महाराष्ट्र काबीज करेल अशी शक्यता आहे.