Monsoon News : महाराष्ट्रातील शेतकरी अगदी चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहत आहेत. राज्याच्या मुख्य भूमीत मान्सून कधी येणार हा मोठा सवाल आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू असल्याची माहिती दिली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे त्याच्या प्रवासाला आणखी वेग आला आहे.
मान्सूनने बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागात मजल मारली असून लवकरच तो भारताच्या मुख्य भूमीत दाखल होणार अशी शक्यता आहे. आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे, मान्सून हा भारताच्या मुख्य भूमीत म्हणजेच केरळमध्ये 31 मे च्या सुमारास दाखल होण्याची शक्यता आहे.
या जाहीर केलेल्या तारखेत तीन-चार दिवसांचा फरक राहू शकतो. म्हणजेच तीन दिवस आधी किंवा तीन दिवस उशिराने मान्सून आगमन होईल असा अंदाज आहे.
28 मे ते तीन जून या कालावधीत कधीही मान्सून केरळात येणार असे म्हटले जात आहे. तथापि बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ जेव्हा शांत होईल तेव्हाच मान्सूनच्या पुढील प्रवासाची दिशा अन दशा समजू शकणार आहे.
परंतु सध्या स्थितीला असलेली मान्सूनसाठीची अनुकूल परिस्थिती पाहता तो 31 मेला केरळात येईल आणि त्यानंतर महाराष्ट्रात दाखल होणार आहे. राज्यातील कोकणासह राजधानी मुंबईत मानसूनचे 10 जूनच्या सुमारास आगमन होणार अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच 15 जूनच्या सुमारास कोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून तो नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा, विदर्भात सक्रिय होणार आहे.
म्हणजेच अहमदनगर, पुणे आणि नाशिक मध्ये 15 जूनच्या सुमारास मान्सूनची एन्ट्री होणार आहे. परंतु यंदा मान्सूनची बंगालची शाखा लवकर सक्रिय होईल असे देखील चित्र तयार होत आहे.
जर असे झाले तर मध्य महाराष्ट्र व खानदेशमधील जिल्ह्यांपेक्षा सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी व त्यांच्या आजूबाजूच्या भागात मान्सूनची लवकर एन्ट्री होऊ शकते असाही अंदाज काही हवामान तज्ञांच्या माध्यमातून समोर आला आहे.
एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहता मान्सून 31 मे च्या सुमारास केरळात येणार आहे त्यानंतर 10 जूनच्या सुमारास तो तळ कोकण आणि मुंबईत सलामी देणार आहे.
मग पुढे 15 जून च्या सुमारास राज्यातील नाशिक, अहमदनगर, पुणे सहित मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात तसेच मराठवाडा आणि विदर्भात दाखल होणार आहे.