Monsoon News : गेल्यावर्षी अर्थातच 2023 च्या मान्सून काळात म्हणजेच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात खूपच कमी पाऊस झाला होता. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत. शिवाय उष्णता देखील प्रचंड वाढली आहे. दुष्काळामुळे शेती क्षेत्राला मोठा फटका बसला आहे.
तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या काही महिन्यांपासून तापमानात देखील मोठी वाढ झाली आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक राज्यांमध्ये तापमानाने नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत.
राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र राज्यात अफगाणिस्तान आणि पाकिस्तान कडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात तापमान वाढ नमूद केली गेली आहे. राज्यातील काही भागांमध्ये तापमान 46 पर्यंत पोहोचले आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेली जनता अन बळीराजा मान्सूनचे आगमन कधी होणार हा सवाल उपस्थित करत आहेत.
दरम्यान भारतीय हवामान खात्याने काल अर्थातच 30 मे 2024 ला मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले असल्याचे जाहीर केले आहे. खरंतर यंदा मानसून केरळमध्ये 31 मे ला येणार असे बोलले जात होते.
हवामान खात्याने तसाच अंदाज दिला होता. पण प्रत्यक्षात तो 30 मे लाच केरळमध्ये येऊन ठेपला आहे. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. खरंतर दरवर्षी केरळमध्ये मान्सून एक जूनला दाखल होत असतो. यंदा मात्र तो दोन दिवस आधीच केरळमध्ये आला आहे.
यामुळे महाराष्ट्रात देखील वेळे आधीच मान्सूनचे आगमन होणार का हा सवाल आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने पुढील आठवड्यात मानसूनचे महाराष्ट्रात आगमन होणार असे स्पष्ट केले आहे. म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो.
सर्वप्रथम मान्सून तळ कोकणात येईल, त्यानंतर मुंबईत पोहोचेल आणि मग हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहिला असता 15 जून पर्यंत मानसून हा संपूर्ण महाराष्ट्र व्यापत असतो. गेल्यावर्षी मात्र महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन उशिराने झाले होते.
यंदा मात्र तशी परिस्थिती राहणार नाही यावर्षी मान्सून महाराष्ट्रात वेळेतचं दाखल होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल असा अंदाज आहे. एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून ज्या मान्सूनची आतुरता होती तो आता केरळात पोहोचला आहे.
विशेष म्हणजे लवकरच तो महाराष्ट्रात देखील येणार आहे. पुढील आठवड्यात त्याचे तळ कोकणात आगमन होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे शेतकरी बांधवांना आपल्या शेतीच्या कामांना वेग द्यावा लागणार आहे.
केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची तारीख
2019 मध्ये मान्सून केरळात ८ जूनला दाखल झाला होता. 2020 मध्ये एक जूनला दाखल झाला होता. 2021 मध्ये तीन जून, 2022 मध्ये 29 मे, 2023 मध्ये 8 जून आणि या चालू 2024 मध्ये मानसून केरळात 30 मे ला आला आहे.