Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : गेल्या काही वर्षांमध्ये देशात रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न झाले आहेत. 2014 मध्ये सत्ता स्थापित केल्यानंतर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देखील रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतलेले आहेत. केंद्र शासनाच्या प्रयत्नांमुळे देशात वंदे भारत एक्सप्रेस सारखी हायस्पीड ट्रेन सुरू झाली आहे.
सध्या भारतात वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे तयार केले जात आहे. देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे. ही ट्रेन ताशी 160 किलोमीटर या वेगाने धावण्यास सक्षम आहे. या देशातील पहिला भारतीय बनावटीच्या हायस्पीड ट्रेनमुळे प्रवाशांचा प्रवास जलद आणि आरामदायी झाला आहे.
मुंबईला आत्तापर्यंत सहा वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. विशेष बाब अशी की आता मुंबईला ताशी 320 किलोमीटर वेगाने धावणारी देशातील पहिली हायस्पीड ट्रेन मिळणार आहे. यामुळे भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्र राज्याची राज्य राजधानी तथा मायानगरी मुंबईमधील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भारतातील पहिली बुलेट ट्रेन लवकरच आता रुळावर येण्याची शक्यता आहे. ही ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणार आहे. मुंबई ते अहमदाबाद हे 508 किलोमीटरचे अंतर या ट्रेनने फक्त दोन तासात कापले जाईल असा अंदाज आहे. विशेष म्हणजे बुलेटट्रेनमुळे मुंबई ते वडोदरा हा प्रवास फक्त आणि फक्त एका तासात पूर्ण होणार आहे.
त्यामुळे मुंबईसहित संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांचे बुलेट ट्रेनकडे लक्ष लागलेले आहे. ही बुलेट ट्रेन केव्हा धावणार ? हाच मोठा सवाल नागरिकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, याच प्रकल्पासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी माहिती दिली आहे.
केव्हा धावणार बुलेट ट्रेन ?
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मुंबई ते अहमदाबाद दरम्यान लवकरच बुलेट ट्रेन धावणार असल्याचे म्हटले आहे. 2026 मध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा सुरू होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.
अर्थातच मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन येत्या दोन वर्षात रुळावर धावण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. खरंतर, हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे लवकरात लवकर काम व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
हेच कारण आहे की, हा प्रकल्प शक्य तेवढ्या लवकर पूर्ण करण्यासाठी नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने कंबर कसली आहे. या प्रकल्पांतर्गत विकसित होत असलेल्या स्थानकांच्या बांधकामात आता लक्षणीय प्रगती झाली आहे.
सागरी बोगद्याचे कामही सुरू झाले आहे. या बोगद्यातूनच बुलेट ट्रेन ठाण्याहून मुंबईला पोहोचणार आहे. हा समुद्राखालील बोगदा जवळपास 7 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. या प्रकल्पात 24 पूल आणि सात डोंगरी बोगदे तयार होणार आहेत.
या प्रकल्पासाठी 1.08 लाख कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. साबरमती, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भरूच, सुरत, बिलीमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई ही या मार्गांवरील प्रमुख स्थानके राहणार आहेत.