Mumbai Goa Vande Bharat Express : येत्या दोन दिवसात म्हणजेच येत्या मंगळवारी कोकण रेल्वे मार्गावर पहिली वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. भोपाळ येथे 27 जून 2023 रोजी या ट्रेनचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे नियोजन रेल्वेने आखले आहे.
विशेष बाब अशी की, या दिवशी एकूण पाच वंदे भारत एक्सप्रेस गाड्या भारतीय रेल्वेच्या माध्यमातून सुरू केल्या जाणार आहेत. या सर्व गाड्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीच हिरवा झेंडा दाखवणार आहेत. मुंबई-गोवा व्यतिरिक्त बंगळुरू ते धारवाड, पटना-रांची, भोपाळ-इंदूर आणि भोपाळ ते जबलपूर या मार्गावरही ही हाय स्पीड ट्रेन मंगळवारी सुरु होणार आहे.
अशातच मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. खरं तर, आतापर्यंत ही ट्रेन आठवड्याच्या सहा दिवस धावणार असं सांगितलं जात होतं. शुक्रवार ऐवजी आठवड्यातील सर्व दिवस ही ट्रेन धावणार असं मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितलं जात होतं.
मात्र आता ही ट्रेन या मार्गावर केवळ तीन दिवस धावणार असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान 27 जून रोजी सुरू होणारी वंदे भारत ट्रेन पावसाळ्यात फक्त तीन दिवस धावणार आहे.
कोणत्या दिवशी धावणार?
मान्सून काळात ही ट्रेन आठवड्यात फक्त तीन दिवस होणार आहे. सीएसएमटीहून मडगाव दरम्यान ही ट्रेन सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी धावणार आहे. ही गाडी सीएसएमटीहून पहाटे ५.३२ वाजता सुटणार असून पुढच्या १० तासांनंतर दुपारी ३. ३० वाजता मडगावला पोहोचेल. तसेच मडगावहून परतीच्या प्रवासासाठी ही एक्सप्रेस मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी धावणार आहे.
परतीच्या प्रवासासाठी ही एक्सप्रेस मडगावहून दुपारी १२.२० वाजता सुटणार आहे. त्यानंतर रात्री १०. २५ पर्यंत ही एक्सप्रेस सीएसएमटीला पोहोचणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ट्रेन आठवड्यातून फक्त तीन दिवस धावण्याचे कारण
दरवर्षी कोकण रेल्वे कडून मान्सून काळात ट्रेनच्या वेळापत्रकात बदल केला जातो. पावसाळ्यात रुळावर पाणी साचते आणि यामुळे अनेकदा ट्रेन वेळेवर पोहोचत नाहीत. परिणामी, कोकण रेल्वेच्या सर्व ट्रेनचे वेळापत्रक हे पावसाळ्यात बदलत असते. मुंबई-गोवा वंदे भारतचे वेळापत्रक देखील पावसाळ्यात याच कारणाने बदलण्यात आले आहे.