Mumbai-Nagpur Expressway : राजधानी मुंबईतील उपराजधानी नागपूर यांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्ग विकसित केला जात आहे. समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा असून या मार्गाचे आतापर्यंत 600 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे.
या महामार्गाने विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई परस्परांना कनेक्ट होणार आहेत. परिणामी राज्याचे कृषी, उद्योग आणि पर्यटन क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारणार आहे.
या महामार्गाचे आत्तापर्यंत दोन टप्पे सुरू झाले आहेत. पहिला टप्पा डिसेंबर 2022 मध्ये सुरू झाला. याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा जवळपास 520 किलोमीटर लांबीचा होता.
यानंतर शिर्डी ते भरवीर हा 80 km लांबीचा टप्पा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरू करण्यात आला आहे. म्हणजेच आतापर्यंत नागपूर ते भरविर हा जवळपास सहाशे किलोमीटर लांबीचा महामार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आला आहे.
त्यामुळे नागपूरहून भरवीर पर्यंतचा प्रवास अतिशय जलद झाला आहे. मात्र असे असले तरी समृद्धी महामार्गाने थेट नागपूर ते मुंबई पर्यंत केव्हा प्रवास करता येणार हा सवाल नागरिकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
अशातच आता समृद्धी महामार्गाचा उर्वरित भाग केव्हा सुरू होणार ? याबाबत आता राज्य रस्ते विकास महामंडळाने एका अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट दिले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, समृद्धी महामार्गाचा उर्वरित 101 किलोमीटर लांबीचा टप्पा 2024 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. अर्थातच येत्या नवीन वर्षात संपूर्ण समृद्धी महामार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे.
विशेष म्हणजे या 101 किलोमीटर लांबीच्या मार्गापैकी 23 किलोमीटर लांबीचा भरवीर ते इगतपुरी टप्पा फेब्रुवारी 2024 मध्ये सुरू होणार अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर मग इगतपुरी ते आमने हा राहिलेला भाग 2024 अखेरपर्यंत सुरू होऊ शकतो असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.
दरम्यान भरवीर ते इगतपुरी हा 23 किलोमीटरचा भाग सुरू झाल्यानंतर मुंबई आणि ठाणे येथील प्रवासी इगतपुरी येथील कनेक्टरवरुन समृद्धी महामार्गावर जाऊ शकणार आहेत.
यामुळे फेब्रुवारीपासून मुंबई आणि ठाण्यातील नागरिकांना शिर्डी आणि नागपूरकडे जाणे आताच्या तुलनेत सोपे होणार आहे. तथापि संपूर्ण महामार्गाचा लाभ हा 2024 अखेरपर्यंतच मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.