Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg : राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर असा समृद्धी महामार्ग तयार होत आहे. या दोन्ही शहरा दरम्यान विकसित होणारा हा महामार्ग तब्बल 701 किलोमीटर लांबीचा आहे. या महामार्गाचे निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे.
आतापर्यंत या मार्गाचे दोन टप्प्याच उद्घाटन झाले आहे. नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा आणि शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटर लांबीचा असा एकूण 600 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे.
यातील नागपूर ते शिर्डी हा टप्पा डिसेंबर 2022 मध्ये सुरू झाला आहे. तसेच शिर्डी ते भरवीर हा मार्ग मे 2023 मध्ये सुरु झाला आहे. विशेष म्हणजे उर्वरित 101 किलोमीटर लांबीचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे.
हा संपूर्ण मार्ग या वर्षाच्या अखेरपर्यंत सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे. हा महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून विकसित होत आहे. विशेष म्हणजे आता समृद्धी महामार्गाचा विस्तार होणार आहे.
भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना देखील आता समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. विस्तारित समृद्धी महामार्गाला राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देखील प्राप्त झाली आहे.
यामुळे या नवीन मार्गाचे काम देखील येत्या काही महिन्यात सुरु होण्याची आशा आहे. खरे तर समृद्धी महामार्ग हा वर्तमान उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे.
त्यामुळे या मार्गाचे काम अगदी जलद गतीने पूर्ण करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. शिवाय या महामार्गाचा विस्तारित मार्ग देखील लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा ते गडचिरोली 142 किलोमीटर, नागपूर ते चंद्रपूर 149 किलोमीटर आणि नागपूर ते गोंदिया 162 किलोमीटरच्या मार्गाचे काम केले जाणार आहे. दुग्गीपार – कोरेगाव – गोंदिया 44 किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाला आहे.
याच महामार्गाच्या धर्तीवर आता भंडारा-गोंदिया व देसाईगंज ते आरमोरी असा समृद्धी महामार्ग विकसित केला जाणार आहे. नागपूर पासून भंडारा ते गडचिरोली असा समृद्धी महामार्ग राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून विकसित होणार आहे.
सदरचे दोन्ही समृद्धी महामार्ग आरमोरी येथे जोडले जाणार आहेत. पुढे हे महामार्ग गडचिरोलीला जोडले जाणार आहेत. यामुळे विदर्भातील या जिल्ह्यांमध्ये एकात्मिक विकास सुनिश्चित होणार आहे.