Mumbai New Bridge : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईत गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही अनेक प्रकल्पांची कामे शहरात सुरू आहेत. शहरात वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून मेट्रोचे जाळे तयार केले जात आहे.
याशिवाय, सध्याचे रस्ते आणखी चांगले बनवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अशातच, आता मुंबईकरांसाठी आणखी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर येत आहे.
ती म्हणजे मुंबईमध्ये असा एक नवीन ब्रिज तयार होणार आहे ज्यामुळे दीड तासाचा प्रवास फक्त दहा मिनिटात पूर्ण होऊ शकणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास हा आधीच्या तुलनेत आणखी सुलभ होईल अशी आशा व्यक्त होत आहे.
कसा राहणार पूल ?
मुंबई महानगरपालिका मुंबईमध्ये एक नवीन ब्रिज तयार करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगर पालिका मढ ते वर्सोवा दरम्यान हा नवीन ब्रिज तयार करणार आहे. या प्रकल्पांतर्गत एक केबल पुल बांधला जाणार आहे.
या पुलाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यामुळं दीड तासांचे अंतर अवघ्या 10 मिनिटांत कापता येणार आहे. यामुळे या संबंधित भागातील वाहतूककोंडी बऱ्यापैकी नियंत्रणात येईल असा आशावाद व्यक्त होत आहे.
मुंबई महापालिकेने अर्थातच बीएमसीने नुकत्याच काही दिवसांपूर्वी या प्रकल्पाच्या कामाचे टेंडर जारी केले आहे. या पुलाच्या प्रकल्पासाठी 1,800 कोटी रुपयाचे टेंडर जारी करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या माध्यमातून समोर आली आहे.
खरंतर हा पूल 2015 मध्येच मंजूर झाला होता. म्हणजेच हा पूल मंजूर होऊन आता जवळपास नऊ वर्षांचा काळ पूर्ण झाला आहे. तथापि अजूनही या पुलाचे काम सुरू होऊ शकलेले नाही.
विशेष बाब अशी की या पुलासाठी 2020 मध्ये अंतिम आराखडा मंजूर करण्यात आला होता. आता मात्र या पुलाच्या कामासाठी टेंडर जारी करण्यात आले आहे. त्यामुळे याचे काम लवकरच सुरू होईल अशी आशा आहे.
पालिकाने खाडीवर पूल उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. या प्रकल्पाला महाराष्ट्र किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने फेब्रुवारी 2023 मध्ये मंजुरी दिलेली आहे. त्यानंतर आता पुलाचा आराखडा आणि बांधकामासाठी निविदा काढण्यात आली आहे.
आता या पुलाच्या उभारणीसाठी तीन ते चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. यामुळे येत्या तीन ते चार वर्षात मढ ते वर्सोवा हा दीड तासाचा प्रवास अवघ्या दहा मिनिटात पूर्ण होणार आहे.