Mumbai News : मुंबईहून साईनगरी शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना एक मोठी भेट मिळणार आहे. आता मुंबई ते शिर्डी हा प्रवास फक्त चार ते साडेचार तासात पूर्ण होऊ शकणार आहे. यामुळे मुंबई येथील भाविकांना जलद गतीने शिर्डीला जाऊन साईबाबांचे दर्शन घेता येणार आहे.
खरे तर साईनगरी शिर्डी येथे संपूर्ण जगभरातील भाविक दर्शनासाठी येत असतात. दररोज येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या ठिकाणी भाविकांची मोठी रेलचल असते. दररोज मुंबईहून देखील मोठ्या प्रमाणात भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी साईनगरी शिर्डीला हजेरी लावतात.
दरम्यान याच भाविकांसाठी एक मोठी बातमी हाती आली आहे. आता समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा अर्थातच भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा सर्वसामान्यांसाठी सुरू झाला असल्याने मुंबईतील भाविकांना जलद गतीने शिर्डीत पोहोचता येणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटर लांबीचा आहे. हा मार्ग राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना कनेक्ट करणारा आहे. आतापर्यंत या महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला आहे.
याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून केले जात असून सुरुवातीच्या टप्प्यात नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा मार्ग सुरू झाला होता.
डिसेंबर 2022 मध्ये हा पहिला टप्पा सुरू झाला आणि त्यानंतर गेल्या वर्षी शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटर लांबीचा दुसरा टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला.
त्यानंतर काल अर्थातच 04 मार्च 2024 रोजी या मार्गाचा तिसरा टप्पा अर्थातच भरवीर ते इगतपुरी हा पंचवीस किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.
भरवीर ते इगतपुरी टप्प्याचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झाले आहे. यामुळे मुंबई ते शिर्डी हा प्रवास वेगवान होणार आहे. तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाले असल्याने आता इगतपुरी येथून शिर्डीच्या दिशेने वेगवान प्रवास करता येणार आहे.
त्यामुळे आता इगतपुरी येथून दीड ते दोन तासात शिर्डी गाठता येणार आहे. आधी इगतपुरी ते शिर्डी हा प्रवास करण्यासाठी अडीच ते तीन तासांचा वेळ जात असे. तसेच मुंबईहून शिर्डी गाठण्यासाठी सात ते आठ तासांचा कालावधी लागतोय.
आता मात्र समृद्धी महामार्गाचे काम मुंबई जवळ आले आहे. यामुळे हा प्रवास चार ते साडेचार तासात पूर्ण होऊ शकणार आहे. संपूर्ण समृद्धी महामार्गाचे काम जुलै 2024 पर्यंत पूर्ण होण्याची आशा आहे.