Mumbai News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईत देखील अनेक रस्ते विकासाचे प्रकल्प पूर्ण झाले असून यामुळे मुंबईमधील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी झाली आहे.
अशातच मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शहरात लवकरच तीन नवीन उड्डाणपूल सुरू होणार आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते वाहतूक व्यवस्था आणखी सक्षम होणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, शहरात दादर टिळक ROB, भायखळा ROB आणि रे रोड ROB विकसित केले जात आहेत. यातील भायखळा ROB हा दक्षिण मुंबईमधील वाहतूक कोंडी फोडणार आहे.
या पुलाचे काम ऑक्टोबर अखेरपर्यंत पूर्ण होईल अशी माहिती समोर येत आहे. हा नवीन ROB महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (महारेल) यांच्या माध्यमातून विकसित केला जात आहे.
हा एक केबल ब्रिज राहणार आहे. मुंबईमध्ये सुरू असलेल्या या तीन उड्डाणपूलांच्या कामांपैकी भायखळा ROB आणि रे रोड ROB यांचे काम लवकर होणार आहे.
येत्या काही महिन्यात हे दोन्ही उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू होणार अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान आता आपण या तिन्ही पुलांची माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत.
रे रोड ROB : या प्रकल्पाचे काम येत्या काही महिन्यात पूर्ण होणार असून या अंतर्गत विकसित होत असलेल्या ROB ची लांबी ही 385 मीटर एवढी आहे. याची उंची ही 9.93 मीटर एवढी असून हा 6 लेनचा उड्डाणपूल तयार होत आहे. यासाठी 145 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
भायखळा ROB : या प्रकल्पासाठी 287 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. याची लांबी 916 मीटर एवढी राहणार आहे. याची उंची 9.70 मीटर एवढी राहणार अशी माहिती समोर आली आहे. यात सध्याच्या ROB व्यतिरिक्त नवीन चार लेन तयार होत आहेत.
दादर टिळक ROB : याची लांबी 663 मीटर आणि उंची 9.40 मीटर एवढी राहणार अशी माहिती समोर आली आहे. यात 6 लेन असतील आणि या प्रकल्पासाठी 325 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.