Mumbai Pune Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. रस्ते विकासाच्या कामांमुळे राज्यातील दळणवळण व्यवस्था ही आधीच्या तुलनेत अधिक मजबूत झाली आहे. राज्यात एकीकडे समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे तर दुसरीकडे शक्तीपीठ महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे.
मुंबई ते नागपूर दरम्यान विकसित होत असलेला 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग आता अंतिम टप्प्यात आहे. या मार्गाचे आत्तापर्यंत नागपूर ते भरवीर हे 600 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे.
विशेष म्हणजे भरवीर ते आमने हे 101 किलोमीटर लांबीचे काम देखील जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. येत्या काही महिन्यात हा संपूर्ण महामार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे.
याशिवाय नागपूर ते गोवा असा 802 किलोमीटर लांबीचा शक्तीपीठ महामार्ग देखील प्रस्तावित करण्यात आला असून याच्या अंतिम आखणीला राज्य शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. यामुळे आता या महामार्गासाठी लवकरात लवकर भूसंपादनाचे काम सुरू होईल आणि त्यानंतर प्रत्यक्षात बांधकामाला सुरुवात होण्याची आशा आहे.
अशातच आता राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई ते पुणे प्रवास गतिमान व्हावा यासाठी द्रुतगती महामार्गाचे आठ पदरीकरण करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव देखील राज्य रस्ते विकास महामंडळाने तयार केला आहे.
विशेष म्हणजे हा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य सरकारकडे वर्ग करण्यात आला आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, 2002 मध्ये मुंबई ते पुणे दरम्यान 94 किलोमीटर लांबीचा द्रुतगती महामार्ग विकसित करण्यात आला आहे. हा एक प्रवेश नियंत्रित महामार्ग आहे.
मात्र या महामार्गावर आता मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. यामुळे या दोन्ही शहर दरम्यानचा प्रवास आता आव्हानात्मक बनला आहे. सध्या स्थितीला मुंबई-पुणे एक्सप्रेस वे सहा पदरी असून आता या मार्गावर होत असलेली वाहतूक कोंडी पाहता हा मार्ग आठ पदरी बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या या मार्गावर दिवसाला एक ते दीड लाख वाहने प्रवास करत आहेत. यामुळे हा सहा पदरी महामार्ग अपुरा पडत आहे. परिणामी आता दोन्ही बाजूला एक-एक लेन वाढवून हा महामार्ग आठ पदरी करण्याचे ठरवले गेले आहे. मुंबई ते पुणे दरम्यानचा 70 किलोमीटर लांबीच्या मार्गाचा विस्तार केला जाणार आहे.
या निर्णयामुळे या मार्गाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी चार मार्गिका उपलब्ध होणार आहेत. याशिवाय कामशेत येथील दोन बोगदे, माडप आणि भातन येथे बोगदे तयार होणार आहेत. म्हणजेच या रस्त्याचा विस्तार करताना या संबंधित ठिकाणी नवीन बोगदे तयार होणार आहेत. यासाठी एमएसआरडीसीला 100 हेक्टर जागेचे संपादन करावे लागणार आहे.
यासाठी जवळपास 600 कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. एकंदरीत मुंबई ते पुणे दरम्यान तयार करण्यात आलेला एक्सप्रेस वे आता आठ पदरी बनवला जाणार आहे. याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून लवकरच राज्य शासन याला मंजुरी देणार अशी आशा व्यक्त होत आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात मुंबई ते पुणे हा प्रवास गतिमान होणार असे बोलले जात आहे.