Mumbai Pune Traffic News : सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात रस्ते विकासाच्या कामांनी जोर पकडला आहे. आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम पाहता शासनाच्या माध्यमातून विविध प्रकल्पांची कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या जात आहेत.
तसेच अनेक नवीन प्रकल्प देखील शासनाकडून सुरू केले जात आहेत. यातच आता मुंबई ते पुणे दरम्यानचा प्रवास गतिमान करण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तब्बल 21 वर्षाच्या काळानंतर सुधारणा केली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या मार्गावरील दोन्ही बाजूने एक-एक लेन वाढवल्या जाणार आहेत. सध्या हा द्रुतगती महामार्ग सहा पदरी आहे. यात पुण्याच्या दिशेने तीन लेन आणि मुंबईच्या दिशेने तीन लेन आहेत. परंतु, या मार्गाच्या दोन्ही दिशेने एक-एक लेन वाढवल्या जाणार आहेत. यामुळे हा महामार्ग आठ पदरी होणार आहे.
म्हणजे हे काम पूर्ण झाले की मुंबईच्या दिशेने प्रवासासाठी चार लेन आणि पुण्याच्या दिशेने प्रवासासाठी चार लेन उपलब्ध होणार आहेत. साहजिकच या निर्णयामुळे या मार्गावरील प्रवास गतिमान होणार आहे. खरंतर हा महामार्ग 21 वर्षांपूर्वी बांधण्यात आला.
त्यावेळी या मार्गावरील वाहनांची संख्या पाहता हा मार्ग प्रवासासाठी पुरेसा होता. मात्र आता वाहनांची संख्या या मार्गावर वाढली आहे. या मार्गावर दिवसाकाठी 60 ते 70 हजार वाहने प्रवास करत आहेत. विशेष म्हणजे शनिवारी आणि रविवारी या मार्गावर वाहनांची संख्या 90 हजाराच्या घरात राहते.
अशा स्थितीत या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते. आठवड्याअखेर म्हणजे विकेंडला या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून या मार्गाच्या दोन्ही बाजूच्या एक एक लेन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यासाठी जवळपास 5000 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. तसेच याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. आता याला मंजुरी मिळाली की, लगेचच अतिरिक्त मार्गिका बांधण्याचे काम सुरू होणार आहे.
याशिवाय, या मार्गावर 10 नवीन बोगदेही बांधावे लागणार आहेत. कारण की मार्गावर असलेले सध्याचे बोगदे वाढवले जाणार नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या लेन वाढवण्यासाठी लागणारी काही जमीन एमएसआरडीसीच्या ताब्यात आहे.
पण काही गावांमधील आणखी जमीन यासाठी ताब्यात घेतली जाणार आहे. तसेच या मार्गांवरील अपघात प्रवण क्षेत्रात उड्डाणपूल देखील बांधले जाणार आहेत. अपघात प्रवण क्षत्रात जवळपास 11 नवीन उड्डाणपुले बांधले जाणार आहेत.