Mumbai Railway News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे राजधानी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकावरून १० एप्रिल पासून नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन सूरु होणार आहे. यामुळे राजधानीमधील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि यामुळे राज्यातील विविध मार्गांवर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मध्य रेल्वे मार्गावर देखील सध्या मोठी गर्दी पाहायला मिळत असून याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा केलेली आहे.
मध्य रेल्वे प्रशासन 184 विशेष उन्हाळी गाड्या चालवणार आहे. सीएसएमटी ते मऊ या दरम्यान देखील विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिलेली आहे.
अशा परिस्थितीत आज आपण या विषयाची एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
कसं राहणार वेळापत्रक ?
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी ते मऊ ही विशेष गाडी 10 एप्रिल ते एक मे 2024 या कालावधीत चालवली जाणार आहे.
ही विशेष गाडी या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री 10 वाजून 35 मिनिटांनी सुटणार आहे आणि मऊ येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजून दहा मिनिटांनी पोहोचणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
तसेच मऊ ते सीएससीएमटी ही विशेष गाडी 12 एप्रिल 2024 ते 3 मे 2024 या कालावधीत चालवली जाणार आहे.
या कालावधीत ही गाडी मऊ रेल्वे स्थानकावरून दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी सुटणार आहे आणि तिसऱ्या दिवशी मध्य रात्री बारा वाजून 40 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राजधानी मुंबई येथे पोहोचणार आहे.
या अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेनचे आरक्षणाबाबत बोलायचं झालं तर यासाठीउद्यापासून आरक्षण सुरू होणार आहे.
उद्या सोमवारी ८ एप्रिल २०२४ पासून भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर आरक्षण सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.