Mumbai Railway News : रेल्वे हे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील एक महत्त्वाचे साधन आहे. संपूर्ण देशभरात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. आपल्या राज्यातही रेल्वेने रोजाना लाखो नागरिक प्रवास करतात. दरम्यान, राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागातील काही एक्सप्रेस, मेल पॅसेंजर गाड्या रेल्वे विभागाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांना काही काळ अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागात दुरुस्तीच्या कामांसाठी काही रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विभागात रूळ दुरुस्ती आणि इंटरलॉकिंगच्या कामासाठी रेल्वे गाड्या रद्द केल्या जाणार आहेत. यामध्ये मुंबई आणि विदर्भातील गोंदिया या शहरामधून धावणाऱ्या एका एक्सप्रेस ट्रेनचा देखील समावेश आहे.
कोणत्या गाड्या रद्द होणार?
मिळालेल्या माहितीनुसार गोंदिया वरून धावणारी शालिमार लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ही एक्सप्रेस गाडी 17 ऑक्टोबर पर्यंत रद्द करण्यात आली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागात दुरुस्तीच्या कामांसाठी ही गाडी रद्द केली जाणार अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. यासोबतच इतवारी टाटानगर पॅसेंजर ट्रेन देखील या दुरुस्तीच्या कामामुळे 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या अडचणी वाढणार
खरंतर संपूर्ण देशभरात ऑक्टोबर महिन्यात नवरात्री उत्सव आणि विजयादशमीचा सण साजरा केला जाणार आहे. मात्र या सणासुदीच्या काळातच रेल्वे विभागाकडून या एक्सप्रेस आणि पॅसेंजर ट्रेन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना सणासुदीच्या काळात मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
दरम्यान विभागातील रेल्वे रूळ दुरुस्ती व अन्य कारणांसाठी या गाड्या रद्द करण्यात आले असल्याने रेल्वे प्रवाशांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन यावेळी रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.