Mumbai-Shirdi Vande Bharat Train : मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस फेब्रुवारी 2023 मध्ये सुरू झाली आहे. तेव्हापासून या हाय स्पीड ट्रेनला प्रवाशांच्या माध्यमातून मोठी पसंती दाखवली जात आहे.
या हाय स्पीड ट्रेनमुळे मुंबई ते शिर्डी दरम्यान चा प्रवास वेगवान झाला आहे. खरे तर शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या प्रमाणात भाविक हजेरी लावत असतात. हजारोंच्या संख्येने नागरिक मुंबईहून शिर्डीला येतात. त्यामुळे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली पाहिजे अशी मागणी होती.
याच मागणीच्या पार्श्वभूमीवर मुंबई ते शिर्डी दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे. गेल्या एका वर्षापासून या मार्गावर ही गाडी सुरू आहे. दरम्यान जर तुम्ही येत्या काही दिवसात या ट्रेनने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 17 मे ते 27 मे या कालावधीत सीएसएमटी ते शिर्डी दरम्यान धावणारी ही गाडी दादर रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे. तसेच शिर्डी वरून येणारी वंदे भारत एक्सप्रेस देखील फक्त दादर रेल्वे स्थानकापर्यंतच धावणार आहे. यामुळे प्रवाशांना काही काळ मनस्ताप सहन करावा लागू शकतो.
जर तुमचाही येत्या काही दिवसात या वंदे भारत ट्रेनने प्रवास करण्याचा प्लॅन असेल तर या बदलानुसारच तुम्हाला तुमच्या प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनवरील (सीएसएमटी) फलाट क्रमांक 10 आणि 11 च्या विस्तारीकरणाच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
या विस्तारीकरणाच्या कामामुळे फक्त सीएसएमटी ते शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसचं नाही तर मुंबई – चेन्नई एक्स्प्रेस, हैदराबाद – मुंबई हुसेनसागर एक्स्प्रेस, भुवनेश्वर – मुंबई कोणार्क एक्स्प्रेस, होस्पेट – मुंबई- होस्पेट एक्स्प्रेस देखील दादर रेल्वे स्थानकापर्यंतचं धावणार आहेत.
आणि या गाड्या दादर रेल्वे स्थानकावरूनच सोडल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या कामामुळे काही एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. दरम्यान आता आपण कोणत्या एक्सप्रेस गाड्या रद्द झाल्या आहेत याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कोणत्या गाड्या रद्द राहणार
28 मे ते दोन जून दरम्यान पुणे ते मुंबई दरम्यान धावणारी प्रगती एक्सप्रेस रद्द राहणार आहे.
31 मे ते दोन जून दरम्यान पुणे-मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस रद्द राहणार आहे.
पुणे ते मुंबई दरम्यान धावणारी डेक्कन एक्सप्रेस या कामामुळे एक आणि दोन जूनला रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच कुर्ला ते मडगाव दरम्यान धावणारी एक्सप्रेस ट्रेन देखील एक आणि दोन जूनला रद्द राहणार आहे.