Mumbai To Goa Expressway : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यात विविध विकास कामे केली जात आहे. समृद्धी महामार्गासारखी हायटेक महामार्गाची कामे राज्य रस्ते विकास महामंडळ करत आहे. समृद्धी महामार्ग हा मुंबई ते नागपूर दरम्यान विकसित होत असलेला सध्याचा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा प्रवेश नियंत्रित महामार्ग आहे. या महामार्गाला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग म्हणून ओळखले जात आहे.
समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 701 किलोमीटर एवढी आहे. आतापर्यंत या महामार्गाचे 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे आणि यावर वाहतूक देखील सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या महामार्गाचे उर्वरित 76 किलोमीटर लांबीचे काम देखील लवकरात लवकर पूर्ण होणार आहे.
संपूर्ण समृद्धी महामार्ग जुलै 2024 पर्यंत सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे. दरम्यान समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर आता मुंबई ते गोवा हा प्रवास गतिमान व्हावा यासाठी द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या स्थितीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई ते गोवा दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेले या महामार्गाचे काम अजूनही पूर्ण होत नसल्याचे वास्तव आहे.
मुंबई ते कोकण वा गोवा हा प्रवास खूपच कष्टदायी ठरत आहे. आता मात्र लवकरच मुंबई ते गोवा हा प्रवास जलद आणि सुपरफास्ट होणार आहे. कारण की, मुंबई ते गोवा प्रवासासाठी दोन नवीन महामार्ग विकसित होणार आहेत.
कोकण द्रुतगती महामार्ग आणि कोकण सागरी किनारा मार्ग असे दोन महामार्ग राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून नव्याने विकसित होणार आहेत. या दोन्ही प्रकल्पांमुळे मुंबई ते कोकण वा गोवा हा प्रवास जलद होणार आहे.
मुंबई ते गोवा द्रुतगती महामार्ग कसा राहणार ?
कोकण द्रुतगती महामार्ग हा 388 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. हा 6 लेनचा प्रवेश नियंत्रित महामार्ग राहील. हाती आलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई येथील पनवेल येथून या महामार्गाची सुरुवात होईल आणि महाराष्ट्र-गोवा हद्दीजवळ हा महामार्ग संपणार आहे.
या महामार्गामुळे आठ तासाचे अंतर फक्त तीन तासात कव्हर होऊ शकणार आहे. या प्रकल्पासाठी 25,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
कसा राहणार कोकण सागरी मार्ग
कोकण सागरी मार्ग हा प्रकल्प देखील राज्य रस्ते विकास महामंडळाकडून विकसित केला जाणार आहे. रेवस ते रेडी असा एकूण ४९८ किमी लांबीचा सागरी किनारा मार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 10 हजार कोटी रुपयांचा खर्च होणार असा एक अंदाज आहे.
या प्रकल्पामुळे देखील मुंबई ते गोवा प्रवास जलद होणार आहे. कोकणातील नागरिकांसाठी कोकण सागरी मार्ग आणि कोकण द्रुतगती महामार्ग हे दोन्ही प्रकल्प विशेष फायद्याचे ठरणार अशी आशा आहे.