Mumbai To Pune Travel : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईतही अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत. मुंबई ट्रांस हार्बर लिंक प्रकल्प हा देखील अलीकडेच सुरू झालेला एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
विशेष म्हणजे आता मुंबई ते पुणे हा प्रवास सुपरफास्ट व्हावा यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून एक नवीन मार्ग तयार केला जाणार आहे.
हा नवीन सहा पदरी मार्ग मुंबई ते पुणे अशा जलद प्रवासासाठी खूपच फायदेशीर राहणार असून यामुळे प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे.
खरे तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मुंबई ट्रांस हार्बर लिंक प्रकल्पाला अर्थातच अटल सेतुला मुंबई-गोवा हायवे, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि जुन्या मुंबई-पुणे हायवे ला जोडण्यासाठी एक नवीन कॉरिडॉर तयार केला जात आहे.
सध्या याचे काम चिर्ले येथे सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत चिर्ले ते गव्हाण फाटा आणि पळस्पे फाटा ते मुंबई-पुणे एक्सप्रेस वे पर्यंत 7.35 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर तयार केला जात आहे. यासाठी जवळपास 1352 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
याशिवाय आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून जेएनपीटी जवळील पोगोटे जंक्शन पासून ते मुंबई-पुणे हायवे वरील चौक जंक्शन पर्यंत जवळपास 29.5 किलोमीटर लांबीचा नवीन मार्ग तयार केला जाणार आहे.
हा नवीन मार्ग सहा पदरी राहणार आहे. हा संपूर्ण ग्रीनफिल्ड कॉरिडॉर राहील. यासाठी जवळपास 3 हजार 10 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. हा प्रकल्प खाजगीकरणातून पूर्ण केला जाणार आहे.
यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निविदा काढल्या आहेत. यानुसार ज्या कंपनीची या मार्गाच्या कामासाठी निवड होणार आहे त्यांना टोलच्या माध्यमातून मार्गाच्या कामाचा खर्च वसूल करता येणार आहे.
या मार्गामुळे मुंबईहून पुण्याला जलद गतीने पोहोचता येणार आहे. पुण्यासह कर्जत-खोपोली येथील नागरिकांना देखील या मार्गाचा फायदा होणार आहे.
यामुळे देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्रातील राज्य राजधानी मुंबई ते राज्याच्या सांस्कृतिक राजधानीचा प्रवास अधिक जलद होईल अशी आशा आहे.