Mumbai Traffic News : सपनो का शहर अर्थातच स्वप्ननगरी म्हणून मुंबई शहर संपूर्ण जगात ख्याती प्राप्त आहे. मुंबई शहरात हजारो लोक उराशी हजारो स्वप्ने बाळगून दस्तक देतात, पोटापाण्यासाठी आलेली ही पब्लिक मात्र कायमचीच मुंबईकर बनते.
मुंबई शहरात अशी मॅग्नेटिक पावर आहे की ती शहरात कामानिमित्त आलेली पब्लिक आपल्याकडेच आकर्षित करते, अशा लोकांना हे शहर माघारी परतू देत नाही. यामुळे मुंबई शहराचा डोलारा दिवसेंदिवस वाढत आहे. शहरासोबतच उपनगरात देखील झपाट्याने विकास होत आहे.
कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या वाढत असून लोकसंख्या गेल्या काही दशकांच्या तुलनेत दुपटीने वाढली आहे. परिणामी वाहनांची संख्या देखील वाढत आहे. याचा परिणाम म्हणून सध्या असलेल्या वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे. शहरातील अनेक भागात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावू लागली आहे.
देशाची आर्थिक राजधानी, बॉलीवूड नगरी, मायानगरी आणि स्वप्ननगरी म्हणून ओळखले जाणारे हे शहर आता वाहतूक कोंडीसाठी संपूर्ण जगात कुख्यात होऊ लागले आहे. परिणामी शहरातील ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.
याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून एक नवीन उड्डाणपूल विकसित केला जाणार आहे. खरंतर पश्चिम द्रुतगती मार्गावरील वांद्रे पूर्व मिठी खाडीजवळून ते माहिम सेनापती बापट मार्गापर्यंत नेहमीच वाहतूक कोंडी पाहायला मिळते.
यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. कधी-कधी पश्चिम द्रुतगती मार्गावरील या भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. या वाहतूक कोंडीमुळे दादर आणि खार, सांताक्रुजपर्यंतची वाहतूक स्लो होते. यामुळे ही वाहतूक कोंडी फोडणे मुंबई महापालिकेने जरुरीचे समजले आहे.
यानुसार आता माहीममधील सेनापती बापट मार्गावरील फिशरमन कॉलनी ते वांद्रे पूर्व इथपर्यंत उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा उड्डाणपूल वांद्रे पूर्व भागातील कलानगर फ्लायओव्हरच्या जवळून सुरू होईल आणि मिठी खाडीवरून सेनापती बापट मार्गाला जोडला जाणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
दरम्यान या प्रस्तावित करण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे उपनगर ते दक्षिण मुंबई प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. या उड्डाणपुलाच्या प्रकल्पासाठी 220 कोटी 17 लाख 40 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असून या पुलाची लांबी जवळपास एक ते सव्वा किलो मीटर एवढी राहणार आहे.
आता या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे. यानुसार निविदा काढण्यात आली आहे. वास्तविक 2022 मध्ये यासाठी निविदा काढण्यात आली होती मात्र काही तांत्रिक कारणांमुळे निविदा प्रक्रिया मागे घेण्यात आली. आता पुन्हा एकदा यासाठी निविदा काढण्यात आली आहे.
हा पूल मिठी खाडीवरून प्रस्तावित करण्यात आला आहे यामुळे सीआरझेड आणि वन विभागाची परवानगी यासाठी बंधनकारक राहणार आहे. विशेष बाब अशी की, ही परवानगी घेण्याची जबाबदारी कंत्राटदारावर सोपवण्यात आली आहे. वास्तविक, याआधी या प्रस्तावित प्रकल्पासाठी एकदा नव्हे तर दोनदा निविदा काढण्यात आल्या होत्या.
मात्र निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्यामुळे आता मुंबई महापालिकेच्या पुल विभागाने पुन्हा एकदा या प्रकल्पासाठी निविदा काढली आहे. यामुळे आता या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळतो का? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.