Mumbai Trans Harbour Link : मुंबईमध्ये विविध विकासाची प्रकल्प हाती घेण्यात आली आहेत. शहरात आणि उपनगरात मेट्रोसह विविध रस्ते विकासाची कामे देखील केली जात आहेत. शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून मुंबई शहरातील आणि उपनगरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध प्रकल्प प्रस्तावित करण्यात आली आहेत.
तर काही प्रकल्पांची सध्या कामे सुरू आहेत. विशेष म्हणजे काही प्रकल्पांची कामे पूर्ण देखील झाली आहेत. यामध्ये मुंबई शहरातील मुंबई ट्रान्स हार्बर लींक प्रकल्पाचा देखील समावेश होतो. हा प्रकल्प मुंबई ते नवी मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे.
या प्रकल्पाला माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाअंतर्गत देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू विकसित झाला आहे. म्हणजेच अटल सेतू हा देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी ब्रिज म्हणून ओळखला जाणार आहे.
जेव्हा या प्रकल्पाचे उद्घाटन होईल तेव्हा हा देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी ब्रिज राहील. या प्रकल्पामुळे मुंबई ते नवी मुंबई हे अंतर फक्त 20 ते 25 मिनिटात पूर्ण होऊ शकते असा आशावाद व्यक्त होत आहे.
विशेष बाब अशी की, या सागरी सेतूमुळे मुंबई ते पुणे हा प्रवास देखील गतिमान होणार आहे. या सेतूमुळे मुंबई ते पुणे हा प्रवास फक्त 90 मिनिटात पूर्ण होऊ शकतो असा आशावाद जाणकार लोकांच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे.
हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच एमएमआरडीएच्या माध्यमातून तयार केला जात आहे. या प्रकल्पाचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून आता फक्त उद्घाटनच बाकी आहे असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही.
याअंतर्गत शिवडी ते न्हावा शेवा दरम्यान ब्रिज विकसित केला जात असून या 21.8 किलोमीटर लांबीच्या ब्रिज पैकी 16 किलोमीटरचे अंतर हे समुद्रावर राहणार आहे. तसेच उर्वरित मार्ग हा जमिनीवर असेल. हा प्रकल्प 25 डिसेंबर 2023 ला सुरू केला जाणार होता.
अटल सेतू हा दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या जयंतीदिनानिमित्त सुरू करण्याची घोषणा राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आली होती. मात्र या नियोजित वेळेत या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नाही यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प डिसेंबर महिन्यात सुरू करता येणे अशक्य असल्याचे सांगितले.
तसेच हा प्रकल्प नवीन वर्षात अगदी सुरुवातीलाच सर्वसामान्यांसाठी सुरू होईल अशी माहिती दिली होती. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता अटल सेतू नेमका केव्हा सुरू होणार याची थेट तारिखच जाहीर केली आहे.
शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे हा बहुचर्चित प्रकल्प 12 जानेवारी 2024 रोजी मुंबईकरांसाठी खुला होणार आहे. यामुळे मुंबईकरांना लवकरच आता नवी मुंबई 20 ते 25 मिनिटात पोहोचता येणे शक्य होणार आहे.