Nagpur Goa Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये महामार्गाचे जाळे तयार केले जात आहे. यामुळे दळणवळण व्यवस्था मजबूत झाली आहे. आधीच्या तुलनेत आता जलद गतीने प्रवास करता येतोय यात शंकाच नाही. राज्यात सध्या नागपूर ते मुंबई या दोन राजधान्यांना कनेक्ट करणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गामुळे राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करताना प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे.
समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 701 किलोमीटर एवढी आहे. यापैकी 625 किलोमीटर लांबीचे काम आतापर्यंत पूर्ण झाले असून यावर वाहतूक सुरू आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सुरुवातीला 2022 मध्ये नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला.
गेल्यावर्षी शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटरचा टप्पा सुरू झाला. तसेच या चालू वर्षी समृद्धी महामार्गाचा भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला आहे. विशेष म्हणजे समृद्धी महामार्गाचा बाकी राहिलेला टप्पा आता जुलै 2024 पर्यंत सुरू करण्याचे नियोजन आहे. एकंदरीत समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
अशातच, आता राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून नागपूर ते गोवा दरम्यान शक्तीपीठ महामार्ग उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा महामार्ग समृद्धी महामार्गाच्या धर्तीवरच तयार केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी या महामार्गाच्या अंतिम आखणीला मान्यता दिली होती.
विशेष म्हणजे या महामार्गाची अधिसूचना देखील निर्गमित झाली आहे. या महामार्गासाठी भूसंपादन करणे हेतू भूसंपादन अधिकाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा मार्ग बारा जिल्ह्यांमधून जाणार असून या 12 जिल्ह्यांसाठी 27 भूसंपादन अधिकार्याची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला आहे. अर्थातच या महामार्गाचे लवकरच भूसंपादन सुरू होणार आहे.
हा मार्ग 805 किलोमीटर लांबीचा असून महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवी मंदिर हे अर्ध शक्तीपीठ वगळता उर्वरित तीन शक्तीपीठांना हा मार्ग कनेक्ट करणार आहे. राज्यातील 19 देवस्थानांना हा मार्ग जोडणार आहे. त्यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार अशी आशा राज्य शासनाने व्यक्त केली आहे.
या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हा प्रवास गतिमान होणार आहे. सध्या नागपूर ते गोवा हा प्रवास करण्यासाठी 21 तासांचा कालावधी खर्च करावा लागतोय, मात्र लवकरच प्रवासाचा हा कालावधी 11 तासांवर येऊन ठेवणार आहे. हा मार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी पर्यंत विकसित होणार आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग या महामार्गाने जोडले जाणार आहे.
जे जिल्हे समृद्धी महामार्गाने जोडली गेलेली नाहीत ती जिल्हे या नव्याने प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाने जोडण्याचे नियोजन आहे. मात्र या महामार्गाचा महाराष्ट्रात मोठा विरोध होऊ लागला आहे. सुरुवातीला या महामार्गाचा विरोध पश्चिम महाराष्ट्रात पाहायला मिळाला. आता तर या मार्गाचा विरोध कोकणातही सुरू झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या महामार्गामुळे अल्पभूधारक शेतकरी भूमीहीन होतील अशी चिंता व्यक्त केली आहे.
एवढेच नाही तर या महामार्गामुळे महापुराचा धोका आणखी वाढण्याची शक्यता पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. दुसरीकडे आता या महामार्गाचा विरोध कोकणातही पाहायला मिळू लागला आहे. कोकणातील शेतकऱ्यांनी हा महामार्ग निसर्गाची मोठी हानी करणार आहे. गरज नसताना हा मार्ग कोकणावर लादला जातोय. सावंतवाडी व दोडामार्ग या तालुक्यातून हा मार्ग जात असून या तालुक्यासाठी हा मार्ग विनाशकारी ठरणार असे येथील लोकांचे म्हणणे आहे.
या मार्गामुळे 50% वन्यजीव विस्थापित होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे या महामार्ग विरोधात न्यायालयात आव्हान दिले जाईल असे येथील वनशक्ती संस्थेने म्हटले आहे. एकंदरीत पश्चिम महाराष्ट्र नंतर आता कोकणातही या महामार्गाला विरोध सुरू झाला असल्याने महाराष्ट्र राज्य शासन याकडे कसे पाहते आणि यावर काय निर्णय घेते हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.