Nagpur Metro News : महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून नागपूरची ओळख आहे. नागपूर संत्र्यांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. मात्र उपराजधानीत गेल्या काही वर्षांपासून होणारी वाहतूक कोंडी पाहता आता विदर्भातील प्रवेशद्वार म्हणून ख्याती प्राप्त असलेले नागपूर ट्रॅफिक जाममुळे अधिक कुख्यात बनत आहे.
यामुळे शहरातील वाहतूक कोंडी फोडून नागरिकांना दिलासा देण्यासाठी शहरात मेट्रोचे जाळे विस्तारण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी खाजगी वाहनांचा वापर करू नये जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही आणि प्रदूषणाला आळा बसेल या हेतूने शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट केल्या जात आहेत.
या पार्श्वभूमीवर मेट्रोचा दुसरा टप्पा देखील लवकरच नागपूरकरांच्या सेवेत दाखल करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. शहरातील मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना लवकरच सुरुवात होणार असे चित्र आहे.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर यांनी नागपूर शहरातील दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोच्या कामांना येत्या दोन महिन्यात सुरुवात होणार असल्याची महत्त्वाची माहिती दिली आहे.
कोणत्या मार्गावर धावणार?
या दुसऱ्या टप्प्यात एकूण तीन महत्त्वाच्या मार्गावर मेट्रो चालवली जाणार आहे. लोकमान्यनगर ते हिंगणा, खापरी ते बुटीबोरी, ऑटोमोटीव्ह चौक ते कामठी या तीन मार्गावर मेट्रो चालवली जाणार आहे.
आता यासाठीचे काम येत्या दोन महिन्यात सुरू होणार असा विश्वास महा मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे लवकरच नागपुरकरांना दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोचा लाभ मिळणार अशी आशा आहे.
किती खर्च होणार
या दुसऱ्या टप्प्यात एकूण 43.8 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग विकसित होणार आहेत. या जवळपास 44 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गावर 38 स्टेशन्स विकसित केले जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,708 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
या प्रकल्पासाठी केंद्र सरकार 20 टक्के, राज्य सरकार 20 टक्के, एमएडीसीचे 3 टक्के, एमआयडीसीचे 3 टक्के आणि पीपीपीच्या माध्यमातून 150 कोटी रुपये उपलब्ध केले जाणार आहेत. विशेष बाब म्हणजे उर्वरित निधी हा कर्ज स्वरूपात उभा केला जाणार असल्याची माहिती महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.