Namo Shetkari Yojana : एप्रिल 2023 मध्ये महाराष्ट्रातील शिंदे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे सरकारने अर्थसंकल्प 2023-24 मध्ये नमो शेतकरी महासनमान निधी योजनेची घोषणा केली आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या राज्यातील योजनेअंतर्गत पीएम किसान प्रमाणेच वार्षिक सहा हजार रुपये पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहेत. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे वार्षिक तीन हप्त्यात या योजनेची रक्कम शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे.
दरम्यान नमो शेतकरीच्या पहिल्या हफ्त्याला नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. पहिल्या हप्त्यासाठी १७२० कोटी रुपयांना मान्यता देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाकडून ही रक्कम कृषी विभागाला हस्तांतरित करण्यात आली आहे. आता कृषी विभागाकडून या योजनेचा पहिला हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
26 तारखेला जमा होणार पहिला हप्ता
नमो शेतकरीचा पहिला हप्ता विजयादशमीच्या दोन दिवसानंतर म्हणजेच 26 ऑक्टोबर 2023 रोजी पात्र शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे. हा पहिला हफ्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान वितरित होणार आहे.
एकंदरीत या योजनेचा पहिला हप्ता हा दिवाळीपूर्वीच पात्र शेतकऱ्यांना मिळणार असल्याने या योजनेच्या लाभार्थ्यांना दिवाळी सणापूर्वीच मोठा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.
किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ ?
पीएम किसानचा मागील चौदावा हप्ता 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. आता नमो शेतकरीचा पहिला हप्ता देखील एवढ्याच शेतकऱ्यांना मिळू शकतो असा दावा केला जात आहे. या योजनेसाठी पात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांची आज अंतिम यादी तयार केली जाणार आहे.
आज या योजनेसाठीची जिल्हानिहाय संख्या अंतिम केली जाणार आहे. दरम्यान या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी तसेच बँक खात्याला आधार लिंक करणे अनिवार्य राहणार आहे. या निकषांची जे शेतकरी पूर्तता करतील त्यांनाच या योजनेचा पहिला हप्ता मिळणार आहे.
पीएम किसानचा चौदाव्या हफ्त्याचा लाभ 85 लाख 60 हजार 73 शेतकऱ्यांना मिळाला होता. यामुळे नमो शेतकरीचा पहिला हप्ता देखील एवढ्या शेतकऱ्यांना मिळेल असेच चित्र आहे.