Namo Shetkari Yojana : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी राज्यातील नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूपच खास राहणार आहे.
नमो शेतकरी योजना ही Pm Kisan च्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. या योजनेची घोषणा वर्तमान शिंदे फडणवीस सरकारने अर्थसंकल्पात केली होती. यानुसार नमो शेतकरी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना पीएम किसान प्रमाणेच वार्षिक सहा हजार रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
ज्याप्रमाणे पीएम किसानच्या लाभार्थ्यांना 2 हजार रुपयांचा एक हफ्ता याप्रमाणे वार्षिक तीन हफ्त्यात लाभ दिला जात आहे त्याचप्रमाणे नमो शेतकरी अंतर्गत देखील पात्र शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. दरम्यान नमो शेतकरीच्या पहिल्या हफ्त्याला राज्य शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे.
या योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी राज्य शासनाने 1720 कोटी रुपयास मंजुरी दिली आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून ही रक्कम कृषी विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. अशातच आता राज्य शासनाकडून हा पहिला हफ्ता 26 ऑक्टोबर 2023 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांमध्ये समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 26 ऑक्टोबर रोजी अर्थातच विजयादशमी झाल्यानंतर दोन दिवसांनी शिर्डी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हजेरी लावणार आहे.
याच दरम्यान या योजनेचा पहिला हप्ता हा मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष बाब अशी की या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह संपूर्ण मंत्रिमंडळ हजेरी लावणार असल्याचे वृत्त देखील एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. निश्चितच 26 तारखेला जर या योजनेचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळाला तर दिवाळी सणापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी भेट ठरणार आहे.