New Expressway : आपल्या देशात एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचे असल्यास आजही रस्ते मार्गाने प्रवास करण्यास पसंती दाखवली जाते. रेल्वे प्रवाशांची संख्या निश्चितच खूपच अधिक आहे. मात्र असे असले तरी रस्त्याने प्रवास करणे अनेकांना आवडते. हेच कारण आहे की केंद्र शासनाच्या माध्यमातून तथा राज्य शासनाच्या माध्यमातून विविध महामार्ग प्रकल्पांची कामे पूर्ण केली जात आहे.
राज्यात नवनवीन महामार्ग विकसित होत आहेत. कोकणातील नागरिकांसाठी देखील काही महामार्ग विकसित केले जात आहेत. खरे तर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम अजूनही पूर्ण होऊ शकलेले नाही.
यामुळे कोकणातील नागरिकांमध्ये सरकार विरोधात मोठी नाराजगी आहे. मात्र भविष्यात मुंबईहून कोकणात प्रवास करणे सोयीचे होणार आहे. कारण की कोकण समुद्रकिनाऱ्यालगत एक नवीन महामार्ग विकसित केला जाणार आहे.
हा मार्ग मुंबई ते सिंधुदुर्ग दरम्यान राहणारा आहे. रेवस ते रेड्डी असा हा ‘सागरी किनारा मार्ग’ विकसित केला जाणार आहे. या सागरी किनारा मार्गामुळे भविष्यात मुंबईहून कोकणात जाणे सोयीचे होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या या प्रकल्पासाठी तांत्रिक निविदा सादर केल्या जात आहेत. MSRDC या प्रकल्पाचे काम पाहत असून प्राधिकरणाने रेवस ते कारंजा आणि आगरदांडा ते दीघी अशा दोन महत्त्वाच्या खाडीपुलांसाठी तांत्रिक निविदा मागवल्या होत्या.
याला विविध कंपन्यांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळत असून तांत्रिक निविदा काढल्यानंतर या प्रकल्पासाठी आर्थिक निविदा निघणार आहेत. या प्रकल्पा अंतर्गत रेवस ते रेड्डी दरम्यान ४४७ किलोमीटर लांबीचा सागरी किनारा मार्ग तयार केला जाणार आहे.
या मार्गात आठ खाडीपूल विकसित होणार आहेत. हा महामार्ग राजधानी मुंबई आणि कोकणाला कनेक्ट करणार आहे. यामुळे कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना आणखी एक नवा पर्याय मिळणार आहे. त्यामुळे कोकणातील प्रवाशांचा प्रवास हा वेगवान होईल अशी आशा आहे.
हा प्रकल्प कोकणातील एकात्मिक विकासासाठी गेम चेंजर ठरू शकतो असा दावा जाणकारांनी केला आहे. मात्र असे असले तर या प्रकल्पाचे काम सुरू होण्यास आणखी काही काळ जाऊ द्यावा लागणार आहे. परंतु जेव्हा हा मार्ग पूर्ण होईल तेव्हा कोकणवासियांची प्रवासातील अडचण कायमची दूर होऊ शकते.